India-China|अरुणाचल केवळ आमचेच, नाव बदलण्याने काहीही साध्य होणार नाही – भारताची तिखट प्रतिक्रिया | पुढारी

India-China|अरुणाचल केवळ आमचेच, नाव बदलण्याने काहीही साध्य होणार नाही - भारताची तिखट प्रतिक्रिया

नवी दिल्ली;पुढारी वृत्तसेवा: अरुणाचल प्रदेश केवळ आमचेच असून, त्याचे नाव बदलून काहीही साध्य होणार नाही, असा टोला परराष्ट्र मंत्रालयाने चीनला लगावला आहे. अलिकडेच चीनने अरुणाचलसहित ११ भागांचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. त्यावर भारताने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. नाव बदलण्याची चीनची परंपरा नवीन नाही आणि नाव बदलल्याने वास्तविकता बदलली जाऊ शकत नाही. असेही परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले आहे. अरुणाचल प्रदेशसह ११ जागांची नावे बदलून त्याची चिनी, तिबेटी व पिनयिन भाषांतील यादी चीनने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केली होती. ज्या ११ भागांची नावे बदलण्याची आगळीक चीनने केली होती, त्यात पाच डोंगराळ भाग, दोन मैदानी भाग, दोन निवासी भाग आणि दोन नद्यांचा समावेश होता.

२०१७ मध्ये चीनकडून पहिली यादी प्रसिद्ध

अरूणाचल प्रदेशांच्या बदललेल्या ११ ठिकाणांच्या नावांची ही तिसरी यादी आहे. यापूर्वी २०१७ मध्ये देखील अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांच्या प्रमाणित नावांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. २०१७ मध्ये, दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीनंतर काही दिवसांनी, चीनने पहिली यादी जाहीर केली होती. दरम्यान दलाई लामा यांच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनने जोरदार टीका केली होती. यानंतर २०१२ मध्ये चीनने अरुणाचलमधील १५ ठिकाणांची दुसरी यादी जाहीर केली होती.

…हा चीनचा सार्वभौम अधिकार – चीन

चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने एका अहवालात चिनी तज्ज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेशच्या नावांची घोषणा करणे हे कायदेशीर पाऊल आहे. भौगोलिक नावांचे प्रमाणिकरण करणे हा चीनचा सार्वभौम अधिकार आहे.

काय आहे भारत चीन सीमावाद

अरुणाचल प्रदेशाबाबत चीनसोबत दीर्घकाळापासून सीमावाद सुरू आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अरुणाचल प्रदेशातील सुमारे ९० हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीनचा दावा आहे. तर, अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असूनही चीन आपल्या कारवाया मागे घेत नाही. चीनकडून वारंवार कारवाया केल्या जात आहेत.

हेही वाचा:

Back to top button