India-China : भारत-चीन लष्करात तवांग सीमेवर धुमश्चक्री; ३०० वर चिन्यांना हुसकावले; ६ भारतीय जवान जखमी | पुढारी

India-China : भारत-चीन लष्करात तवांग सीमेवर धुमश्चक्री; ३०० वर चिन्यांना हुसकावले; ६ भारतीय जवान जखमी

इटानगर : वृत्तसंस्था ; अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात चिनी सैनिकांनी पुन्हा गलवान खोऱ्याची पुनरावृत्ती केली. चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसले. भारतीय जवानांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. दोन्ही बाजूंनी जोरदार धुमश्चक्री झाली. चकमकीत (India-China) अखेर भारतीय जवानांनी चिन्यांना हुसकावून लावले. सहा भारतीय जवान या घटनेत जखमी झाले. भारतीय लष्कराकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

India-China : भारतीय लष्कराचे चीनला सडेतोड उत्तर

भारतीय लष्कराने चीनला सडेतोड उत्तर दिले आहे, असे लष्करातील सूत्रांकडून सांगण्यात आले. तवांगमधील ही चकमक ९ डिसेंबर रोजी घडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तवांगमधील या चकमकीत तीनशेवर चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी त्यांना निकराने रोखले. आगळीक चिनी सैनिकांनी केली; पण भारतीय जवान त्यांना पुरून उरले. अखेर चिनी सैनिकांना माघार घ्यावीच लागली. सुदैवाने भारताचा कुठलाही जवान गंभीररीत्या जखमी झालेला नाही. या चकमकीनंतर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून भारतीय लष्करांच्या कमांडर्सनी चिनी कमांडर्ससोबत फ्लॅग मिटिंग घेतली. याआधी ऑक्टोबर २०२१ मध्येही अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मोठा वाद झाला होता. तेव्हा २०० चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसले होते. काही तासांच्या वादविवादानंतर भारतीय जवानांनी त्यांना हुसकावून लावले होते. लडाख, अरुणाचल, सिक्कीम पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अजेंड्यावर याआधीच इंग्रजी दैनिक ‘द टेलिग्राफ’ने अरुणाचल प्रदेश तसेच सिक्कीममध्ये चिनी सैन्य एलएसीवर आक्रमक पाऊल उचलणार असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. लडाखची जैसे थे स्थिती बदलण्यासह अरुणाचल आणि सिक्कीमही चीनच्या अजेंड्यावर आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने संपूर्ण एलएसीवर पेट्रोलिंग वाढवलेले आहे. अनेक नव्या चौक्या सुरू केल्या आहेत, असा तपशीलही या वृत्तात होता.. चीनच्या या पूर्वतयारीला उत्तर म्हणूनच भारत आणि अमेरिकेने मिळून चीन सीमेवर संयुक्त युद्धसराव केला.

सहा भारतीय जवानांना गुवाहाटीतील लष्करी रुग्णालयात दाखल केले आहे. याआधी १५ जून २०२० रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते, तर ३८ वर चिनी सैनिक मारले गेले होते.

चीनची नेहमी आगळीक का?

  • भारत-चीनदरम्यान ३ हजार ४८८ किलोमीटरच्या एलएसीतील १ हजार ३४६ किलोमीटरचा भाग हा पूर्व क्षेत्रात मोडतो. एकट्या तवांग सेक्टरमध्ये ही सीमा २७० किलोमीटर अंतराची आहे.
  • पूर्व सेक्टरमधील ९० हजार चौरस किलोमीटरचा भाग म्हणजेच संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा आमचा भाग आहे, असा चीनचा सतत दावा असून, भारताने तो वारंवार फेटाळून लावलेला आहे.

हेही वाचा

Back to top button