भारत-चीन सीमेवर तणाव : अरुणाचल प्रदेशमध्‍ये लढाऊ विमानांची हवाई गस्‍त | पुढारी

भारत-चीन सीमेवर तणाव : अरुणाचल प्रदेशमध्‍ये लढाऊ विमानांची हवाई गस्‍त

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात चिनी सैनिकांनी पुन्हा गलवान खोऱ्याची पुनरावृत्ती केली. चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसले. भारतीय जवानांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. आता चीनकडून होणारे हवाई उल्लंघन रोखण्यासाठी भारतीय हवाई दलाने अरुणाचल प्रदेशच्‍या सीमेवर लढाऊ हवाई गस्त सुरू केली आहे. 9 डिसेंबरला तवांगमध्ये झालेल्या चकमकीपूर्वीही चीनने अरुणाचल सीमेवर ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतरही भारतीय वायुसेनेने तातडीने आपले लढाऊ विमान अरुणाचल सीमेवर तैनात केले होते, असे ‘एएनआय’ वृत्तसंस्‍थेने सूत्रांच्‍या हवाल्‍याने म्‍हटलं आहे.

मागील आठवड्यात चीनच्‍या ड्रोनला रोखले

‘एएनआय’ने वृत्तात म्‍हटलं आहे की, तवांगजवळील यंगत्से येथील दोन भागात चीन भारतीय चौक्यांना विरोध करत आहे. गेल्या काही आठवड्यांत भारतीय लढाऊ विमानांनी 2-3 वेळा होलीदीप आणि परिक्रमा भागातील चौक्यांकडे जाणाऱ्या ड्रोनला रोखले आहे. सुखोई-३० एमकेआयने हे हवाई उल्लंघन थांबवले होते.

विमान आणि ड्रोन भारतीय सीमेकडे उड्डाण करत असतील आणि त्यांच्या आक्रमक हालचाली आमच्या रडारवर दिसल्या तर ते हवाई उल्लंघन असेल आणि भारतीय हवाई दल यावर त्वरित कारवाई करण्‍यासाठी सज्‍ज आहे.
ईशान्य भागात हवाई दल भक्‍कम आहे. सुखोई-३० आसाममधील तेजपूर आणि चबुआ येथे अनेक ठिकाणी तैनात आहेत. बंगालमधील हाशिमारा येथे राफेल लढाऊ विमानेही तैनात आहेत, खूप कमी वेळात ती ईशान्य भागाला पूर्णपणे व्‍यापू शकतात, असेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

चिनी सैनिकांची आगळीक, भारताचे सडेतोड प्रत्‍युत्तर

तवांगमधील भारत आणि चीन सैनिकांमध्‍ये ९ डिसेंबर रोजी चकमक झाल्‍याचे विश्वसनीय वृत्त आहे. तवांगमधील या चकमकीत तीनशेवर चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी त्यांना निकराने रोखले. आगळीक चिनी सैनिकांनी केली; पण भारतीय जवान त्यांना पुरून उरले. अखेर चिनी सैनिकांना माघार घ्यावीच लागली. सुदैवाने भारताचा कुठलाही जवान गंभीररीत्या जखमी झालेला नाही.

या चकमकीनंतर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून भारतीय लष्करांच्या कमांडर्सनी चिनी कमांडर्ससोबत फ्लॅग मिटिंग घेतली. याआधी ऑक्टोबर २०२१ मध्येही अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मोठा वाद झाला होता. तेव्हा २०० चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसले होते. काही तासांच्या वादविवादानंतर भारतीय जवानांनी त्यांना हुसकावून लावले होते. लडाख, अरुणाचल, सिक्कीम पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अजेंड्यावर याआधीच इंग्रजी दैनिक ‘द टेलिग्राफ’ने अरुणाचल प्रदेश तसेच सिक्कीममध्ये चिनी सैन्य एलएसीवर आक्रमक पाऊल उचलणार असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. लडाखची जैसे थे स्थिती बदलण्यासह अरुणाचल आणि सिक्कीमही चीनच्या अजेंड्यावर आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने संपूर्ण एलएसीवर पेट्रोलिंग वाढवलेले आहे. अनेक नव्या चौक्या सुरू केल्या आहेत, असा तपशीलही या वृत्तात होता.. चीनच्या या पूर्वतयारीला उत्तर म्हणूनच भारत आणि अमेरिकेने मिळून चीन सीमेवर संयुक्त युद्धसराव केला.

चीनची नेहमी आगळीक का?

भारत-चीनदरम्यान ३ हजार ४८८ किलोमीटरच्या एलएसीतील १ हजार ३४६ किलोमीटरचा भाग हा पूर्व क्षेत्रात मोडतो. एकट्या तवांग सेक्टरमध्ये ही सीमा २७० किलोमीटर अंतराची आहे. पूर्व सेक्टरमधील ९० हजार चौरस किलोमीटरचा भाग म्हणजेच संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा आमचा भाग आहे, असा चीनचा सतत दावा असून, भारताने तो वारंवार फेटाळून लावलेला आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button