अदानी प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ, राज्यसभेचे कामकाज १३ मार्चपर्यंत तहकूब | पुढारी

अदानी प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ, राज्यसभेचे कामकाज १३ मार्चपर्यंत तहकूब

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन करण्याच्या मागणीवरून सोमवारीही विरोधकांचा गदारोळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब केल्यानंतर पुढील महिन्याच्या १३  मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. यानंतर सभापती जगदीप धनखर यांना सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

गोंधळ पाहून जगदीप धनखर म्हणाले की, जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. आपण आधीच खूप वेळ वाया घालवला आहे. सभागृहात अशाप्रकारे व्यत्यय आल्यास लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्यास मला भाग पडेल. विरोधकांच्या गदारोळामुळे सकाळी सभागृह तहकूब केल्यानंतर पुन्हा ११ वाजून ५० मिनीटांनी सुरू झाले. तरीही सभागृहात गोंधळ सुरूच होता. सत्ताधारी पक्षाने अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची आणि रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. विरोधी सदस्यांनी गदारोळ केल्याने सभापती जगदीप धनखर यांनी प्रथम शून्य तास आणि नंतर प्रश्नोत्तराचा तास चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र जेपीसीची मागणी करणाऱ्या विरोधी सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. सभागृहाचे कामकाज चालू देण्यासाठी धनखर यांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना वारंवार आवाहन केले. मात्र त्यांच्या आवाहनाचा कोणताही परिणाम न झाल्याने त्यांनी सभागृह १३ मार्च पर्यंत तहकूब केले.

हेही वाचा :

Back to top button