Chinese spy balloon row | अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी ८ दिवसांत ४ फ्लाइंग ऑब्जेक्ट्सवर साधला निशाणा

Chinese spy balloon row | अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी ८ दिवसांत ४ फ्लाइंग ऑब्जेक्ट्सवर साधला निशाणा

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लढाऊ विमानाने रविवारी हुरॉन सरोवरावर उडणारी आणखी एक अज्ञात वस्तू खाली पाडली. अमेरिकेने ८ दिवसांत अशा ४ उडणाऱ्या संशयास्पद वस्तू नष्ट केल्या आहेत. याआधी अमेरिकेच्या फायटर जेटने अलास्का येथे उंचावर उडणारी एक अनोळखी वस्तू (US shot down an object) खाली पाडली होती. ही वस्तू एका छोट्या कारच्या आकाराची असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले होते. (Chinese spy balloon row)
तर जानेवारीच्या अखेरीस चीनचा स्पाय बलून (हेरगिरी बलून) अमेरिकेने पाडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उच्च सतर्कता बाळगण्यात आली आहे. बलून पाडण्यापूर्वी अमेरिकेने आपली तिन्ही विमानतळे बंद केली होती. चिनी बलून ६० हजार फुटांवर उडत असताना हवाई दलाच्या लँगले तळावरून अमेरिकेने मारा केला. बलूनचे अवशेष समुद्रात कोसळले होते.
"आम्ही आमच्या हवाई क्षेत्राची अधिक बारकाईने तपासणी करत आहोत. त्यासाठी रडार यंत्रणा मजबूत करण्यात आली आहे.," असे सहाय्यक संरक्षण सचिव मेलिसा डाल्टन यांनी म्हटले आहे. नुकतीच पाडण्यात आलेली वस्तू ही उंचावर पहिल्यांदा मॉन्टाना येथे शनिवारी सायंकाळी दिसून आली होती. ही वस्तू रविवारी मिशिगनच्या वरच्या द्वीपकल्पावर घोंघावत असल्याचे रडारच्या साहाय्याने दिसून आले. त्यानंतर हुरॉन सरोवराच्या दिशेने जाताना ती दिसली होती, पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कॅनडातही संशयास्पद उडती वस्तू

अमेरिकेनंतर कॅनडातील युकॉन प्रांतातील मायोलगतच्या आकाशातही दंडगोलाकार वस्तू उडत असलेली दिसताच अमेरिकन फायटर जेट एफ- 22 ने क्षेपणास्त्र हल्ला करून ती पाडली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. मी या वस्तूबद्दल अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी बोललो आणि त्यांनी लगोलग मदत पुरविली. कॅनेडियन लष्कर या वस्तूचे अवशेष ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवेल, असेही ट्रुडो यांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी अमेरिकेतील अलास्कात अशीच एक वस्तू उडताना आढळली होती. अमेरिकन फायटर जेटने ४० हजार फूट उंचावरून ती खाली पाडली. गेल्या काही दिवसांत आकाशात संशयास्पद वस्तू आढळण्याची ही सलग चौथी घटना आहे. ५ फेब्रुवारीला अमेरिकेने चिनी स्पाय बलून पाडल्यानंतरची ही चौथी घटना आहे. कॅनडातील आकाशातून पाडण्यात आलेली वस्तू चिनी स्पाय बलूनपेक्षा आकाराने फारच लहान होती. ट्रुडो यांच्या निवेदनानंतर पेंटागॉनचे प्रवक्ते जनरल पॅट रायडर यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. (Chinese spy balloon row)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news