.. अन्यथा नव्या राज्यपालांशी संघर्ष अटळ; विरोधकांचा इशारा

.. अन्यथा नव्या राज्यपालांशी संघर्ष अटळ; विरोधकांचा इशारा
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतरही विरोधकांनी त्यांच्या विरोधातील आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. कोश्यारी यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवितानाच महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यघटनेच्या चौकटीत काम करावे. शिंदे-फडणवीस सरकारच्या कोणत्या शिफारशी, निर्णय मान्य करायच्या याबाबत घटनात्मक प्रमुख म्हणून भान ठेवावे. अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशाराच रविवारी विरोध पक्षांच्या नेत्यांनी दिला. विशेषतः विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांबाबतच्या प्रस्तावावरून आगामी काळात संघर्षाचे संकेतच विरोधकांनी यानिमित्ताने दिले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी कोश्यारी आणि भाजपवर टीका करत निर्णयाचे स्वागत केले. कोश्यारी यांची महापुरुषांसंदर्भातील विधाने, महाविकास आघाडी सरकारसोबतचा त्यांचा संघर्ष, विधान परिषदेतील बारा सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला दिलेला खो, मुंबईच्या विकासातील मराठी माणसांचे स्थान, राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळातील त्यांची भूमिका यावरून राज्यपाल कोश्यारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने संघर्षाचे प्रसंग उद्भवले होते. कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तर स्वतः कोश्यारी यांनी स्वतःच आपणास राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. अखेर आज त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्राची सुटका झाली : शरद पवार

राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर नागपूर दौर्‍यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले. आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने सुटका झाली आहे. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल म्हणून झाली नव्हती, ती आपण पाहिली, असे पवार म्हणाले.

घटनेनुसार काम करावे : संजय राऊत

शिवसेना (ठाकरे गट) नेते, खा. संजय राऊत यांनी नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे. राजभवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. राज्यात विरोधी पक्षाचा आवाज आहे, घटनेनुसार आहे. तो ऐकायला हवा. शिंदे-फडणवीस सरकारच घटनाबाह्य आहे, याचे भान राज्यपालांनी ठेवले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

नव्या राज्यपालांनी निष्पक्ष काम करावे : पटोले

कोश्यारींची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्राने महाराष्ट्राचा अवमान केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नवे राज्यपाल रमेश बैस यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या पावलावर पावले न टाकता, निष्पक्षपणे कार्य करावे आणि कोश्यारींनी घालवलेली राज्यपाल पदाची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करावी, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

भाजपचे बाहुले बनणार नाहीत अशी अपेक्षा : जयंत पाटील

राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणार्‍या कोश्यारींमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाल्याचे सांगत नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

उशिरा सुचलेले शहाणपण : संभाजीराजे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला, हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. त्यांच्या जागी आलेले नवीन राज्यपाल रमेश बैस यांना शुभेच्छा आहेत. पण त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती टिकवावी व देशभरात पोहोचवावी, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे यांनी नाशिक येथे केले. राज्यपाल कोश्यारी यांनी दोन महिन्यांपूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खंत वाटते, उशीर झाला आहे : खा. उदयनराजे

भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाचे भान बाळगले नाही, अशी टीका करत त्यांच्या राजीनाम्याप्रकरणी उशीर झाला, अशी प्रतिक्रिया खा. उदयनराजे भोसले यांनी नाशिकमध्ये दिली. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. या पदावरील व्यक्तीने जबाबदारीने वक्तव्य करणे अपेक्षित आहे. पण, राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अपेक्षित नव्हते. 'वेळेत जर निर्णय घेतला, तर बरेच काही सावरता येते,' असे सांगत खा. भोसले यांनी कोश्यारी यांच्या राजीनामा मंजुरीचे समर्थन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news