‘ती’ विद्यार्थिनी बनून गेली अन् आरोपींपर्यंत पोहोचली! | पुढारी

'ती' विद्यार्थिनी बनून गेली अन् आरोपींपर्यंत पोहोचली!

इंदूर; वृत्तसंस्था : एका निनावी पत्रावरून पोलिसांना वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंगची माहिती मिळते, पण प्रयत्न करूनही कोणाताच धागादोरा सापडत नाही. शेवटी एका महिला कॉन्स्टेबलला ‘अंडरकव्हर’ विद्यार्थिनी म्हणून तेथे पाठविले जाते आणि ती या गुन्ह्याची उकल करते…

एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडला आहे. एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये नवख्या विद्यार्थिनीसारखीच दिसणारी एक तरुणी नर्सिंगची विद्यार्थिनी म्हणून दाखल होते. दररोज ती काही तास तेथील कँटीनमध्ये घालवते. तेथे येणाऱ्या विद्यार्थ्यांपासून कँटीनच्या स्टाफपर्यंत सर्वांशी मैत्री करते. त्यांना आपल्यावर (न) झालेल्या रॅगिंगच्या काल्पनिक कथा ऐकवून त्यांचा विश्वास संपादन करते आणि शेवटी रॅगिंग करणाऱ्या ११ वरिष्ठ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. ही कामगिरी बजावताना तिच्यावर कोणालाही संशय येत नाही, हे विशेष! शालिनी चौहान (२४) असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाद्दलचे वृत्त दिले आहे.

गेल्या जुलैमध्ये या महाविद्यालयात क्रूर पद्धतीने रॅगिंग झाल्याचे निनावी पत्र पोलिसांना पाठविण्यात आले होते. नुकत्याच पोलिस दलात रुजू झालेल्या, इंदूरच्या संयोगितागंज पोलिस ठाण्यात नेमणूक झालेल्या चुणचुणित शालिनीची वरिष्ठांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी निवड केली. महाविद्यालयात विद्यार्थिनी म्हणून वावरत आरोपींचा माग काढण्याची पहिलीच जबाबदारी तिच्याकडे सोपविण्यात आली. ती महाविद्यालयीन तरुणीप्रमाणे जीनची पॅण्ट आणि टॉप परिधान करून विद्यार्थिनीच्या रूपात या महाविद्यालयात जाऊ लागली. वास्तविक ती एक वाणिज्य पदवीधर, पण नर्सिंगची विद्यार्थिनी म्हणून तिने आपला परिचय तेथे करून दिला. या मोहिमेचे नेतृत्व वरिष्ठ अधिकारी तहजीब काझी आणि उपनिरीक्षक सत्यजीत चौहान हे करीत होते. त्यांना काही सीनिअर विद्यार्थ्यांवर रॅगिंगचा संशय होता. त्यांच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी त्यांनी शालिनीवर सोपविली. ‘मी या कामासाठी रोज टप्प्याटप्प्याने पाच ते सहा तास कँटीनमध्ये, तेथे येणाऱ्या सर्वप्रकारच्या मुला-मुलींशी गप्पा मारत बसत होते. यातूनच आरोपींपर्यंत पोहोचता आले,’ असे शालिनी सांगते.

‘त्या’ विद्यार्थ्यांना नोटीस

तपास अधिकारी काझी यांनी सांगितले की शालिनी पोलिस वाटत नाही, म्हणूनच तिची नेमणूक या मोहिमेवर करण्यात आली. तिच्यावर विद्यार्थ्यांनी लगेच विश्वास ठेवला. तिने ही कामगिरी बजावली नसती, तर आरोपींपर्यंत आम्हाला पोहोचता आलेच नसते. ११ आरोपींपैकी ९ मध्य प्रदेशातील आणि दोघे पश्चिम बंगाल व बिहारमधील आहेत. त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून नोटीस देण्यात आली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. हे सर्व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांना फक्त नोटीस दिली आहे. महाविद्यालयाने त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे.

Back to top button