पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या निरोगी असून, त्यांचे इन्सुलिनचा डोस सुरूच ठेवण्यास एम्सच्या वैद्यकीय मंडळाने सांगितले आहे. एम्सच्या पाच डॉक्टरांच्या पथकाने शनिवारी (दि.२७) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला. त्यानंतर इन्सुलिन सुरूच ठेवण्याच्या सूचना तुरुंग प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Arvind Kejriwal)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या रक्ताती शुगर वाढल्याने, तुरुंगात इन्शुलिन द्यावे, त्यांच्या खाजगी डॉक्टरांशी रोज १५ मिनिटांची सल्लामसलत करण्याची परवानी द्यावी दरम्यान पत्नीला देखील ऑनलाईन उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी; अशी मागणी प्रशासनाला केली होती. दरम्यान अरविंद केजरीवाल यांना या मागणीसाठी दिल्ली न्यायालयात याचिका दाखल देखील केली होती. परंतु दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांची मागणी नाकारत शासनाकडून स्थापित वैद्यकीय मंडळाकडूनचे उपचार घेण्यास सांगितले होते. (Arvind Kejriwal)
दरम्यान आज (दि.२७) व्हिसीद्वारे एम्स वैद्यकीय मंडळाकडून अरविंद केजरीवालांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर केजरीवालांचे इन्सुलिन सुरूच ठेवण्याच्या सूचना एम्स वैद्यकीय मंडळाने प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी तिहार तुरुंगातील दोन डॉक्टरही उपस्थित होते, हि व्हिडिओ कॉन्फरन्स सुमारे अर्धा तास चालली, अशी माहिती तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिल्याचे 'इंडिया टुडे'च्या वृत्तात म्हटले आहे. (Arvind Kejriwal)
"बोर्डाने अरविंद केजरीवाल यांना ते आधीच घेत असलेली औषधे सुरू ठेवण्यास सांगितले. केजरीवाल यांना तुरुंगात इंसुलिनच्या दोन युनिट्सचा डोस सुरू ठेवण्यास सांगण्यात आले," सूत्राने सांगितले. या आठवड्याच्या सुरुवातीला साखरेची पातळी 320 वर गेल्यानंतर आप सुप्रिमो अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात इन्सुलिनचा पहिला डोस देण्यात आला. होता. त्यानंतर देखील इन्सुलिन सुरूच ठेवण्याचे आदेश एम्स वैद्यकीय मंडळाने दिले आहेत.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती. ते १ एप्रिलपासून तिहार तुरुंग क्रमांक २ मध्ये बंद आहेत.