Justice U U Lalit : न्‍यायमूर्ती उदय लळित होणार देशाचे नवे सरन्‍यायाधीश, एन. व्ही. रमणा यांनी केली केंद्र सरकारकडे शिफारस | पुढारी

Justice U U Lalit : न्‍यायमूर्ती उदय लळित होणार देशाचे नवे सरन्‍यायाधीश, एन. व्ही. रमणा यांनी केली केंद्र सरकारकडे शिफारस

नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा : चालू महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्‍त होत असलेल्या सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी आपल्या उत्‍तराधिकार्‍याच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली असून, महाराष्ट्राचे सुपूत्र उदय उमेश उर्फ यू. यू. लळीत यांच्या नावाची शिफारस रमणा यांनी केली आहे. वरिष्ठता श्रेणीत लळीत सर्वात आघाडीवर असल्याने सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्‍ती होणे ही आता औपचारिकता मानली जात आहे.

येत्या 26 ऑगस्ट रोजी एन. व्ही. रमणा हे सेवानिवृत्‍त होत आहेत. केंद्र सरकारने त्यांना उत्‍तराधिकार्‍याचे नाव लिफाफाबंद पाकिटात द्यावे, अशी विचारणा केली होती. त्यानुसार रमणा यांनी लळीत यांच्या नावाची शिफारस करीत तसा लिफाफा कायदा व न्याय मंत्रालयाकडे सुपूर्द केल्याचे सूत्रांनी सांगितले.लळीत हे सरन्यायाधीश बनले तर ते देशाचे 49 वे सरन्यायाधीश ठरतील. वरिष्ठतेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या पहिल्या दोन नावांपैकी एक नाव विद्यमान सरन्यायाधीश केंद्र सरकारला सुचवितात आणि ती शिफारस केंद्राकडून राष्ट्रपतींना पाठविली जाते. सर्वोच्च न्यायालयात सध्या लळीत यांच्यानंतर डी. वाय. चंद्रचूड सर्वात वरिष्ठ आहेत.

न्यायमूर्ती यू. यू. लळीत मूळचे कोकणातले असून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या न्यायमूर्ती लळीत यांचे कुटुंबीय रायगड जिल्ह्यातील आपटा येथे स्थायिक झालेले आहे. यू. यू. लळीत यांचा जन्म मुंबईतील आंगे्रवाडी येथे झाला. वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील ज्येष्ठ वकील स्व. एम. ए. राणे यांच्याकडे काही वर्षे त्यांनी सहाय्यक म्हणून काम केले. नंतर ते दिल्‍लीला आले आणि सहा वर्षे ज्येष्ठ विधीज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले. अनेक वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करीत होते. 2004 साली सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्‍ती झाली. अनेक महत्वाच्या प्रकरणांत त्यांनी बाजू मांडली होती. त्यात स्पेक्ट्रम घोटाळा खटल्याचा समावेश आहे. केंद्र सरकारने त्यावेळी सरकारी वकील म्हणून लळीत यांची नियुक्‍ती केली होती.

हेही वाचा : 

Back to top button