राहु : सीएनजी दरवाढीने वाहनचालकांत नाराजी; ग्रामीण भागातील ग्राहकांच्या खिशाला कात्री | पुढारी

राहु : सीएनजी दरवाढीने वाहनचालकांत नाराजी; ग्रामीण भागातील ग्राहकांच्या खिशाला कात्री

राहु; पुढारी वृत्तसेवा: राज्यात महागाई दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेल दरात कपात करून नागरिकांना राज्य सरकारने दिलासा दिला होता. मात्र, आता सीएनजीच्या दरात अचानक सहा रुपयांनी वाढ केल्याने पुन्हा एकदा महागाईचा शॉक नागरिकांना बसला आहे. सद्यस्थितीत महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली असली तरी इतर जीवनावश्यक वस्तू कमालीच्या महाग झाल्या आहेत. रोज वापर असणार्‍या सीएनजीच्या दरात सहा रुपयांनी वाढ झाली आहे. सातत्याने सीएनजी गॅस दरात मोठी वाढ होत असून, सीएनजी वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे.

पुणे जिल्याच्या ग्रामीण भागामध्ये वर्षभरापासून सीएनजी वाहनधारकांचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला सीएनजी दर कमी असल्याने अनेक नागरिकांनी सीएनजी वाहन खरेदीस प्राधान्य दिले. मात्र हळूहळू सीएनजी दरात वाढ होत असून आता पेट्रोल दराच्या जवळपास सीएनजी दर गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सीएनजी गॅस दर वाढत असल्याने वाहनचालकांना मोठा फटका सहन करावा लागतो आहे. सीएनजीचे दर 86 रुपयांवरून आता 92 रुपयांवर गेले आहेत. मात्र, सीएनजीचे दर वाढत असले तरी सीएनजी भरण्यासाठी सुमारे तासभर वेळ जात असल्यामुळे नागरिकांना याचा दुहेरी फटका बसत आहे.

वर्षभरापूर्वी सीएनजी वापर असलेली गाडी घेतली, मात्र वर्षभरात दरामध्ये जवळपास तीस रुपये वाढ झाली. आता वाहन फिरवणेही मुश्कील झाले आहे.

                                                              – मच्छिंद्र मेमाणे, सीएनजी वाहनधारक.

 

Back to top button