Nagpur Lok Sabha Elections 2024 : नागपुरात नितीन गडकरीविरोधात काँग्रेसचा ‘हा’ नेता रिंगणात | पुढारी

Nagpur Lok Sabha Elections 2024 : नागपुरात नितीन गडकरीविरोधात काँग्रेसचा 'हा' नेता रिंगणात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरातून केंद्रीय महामार्ग मंत्री, भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्याशी दोन हात करण्यासाठी अखेर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आ अभिजीत वंजारी यांचेही नावावर चर्चा झाली. गेले काही दिवस आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी यांनी आपण लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले होते. मात्र, आज (दि.१९) नागपुरातील स्थानिक नेत्यांच्या बैठकीत यावर एकमत झाले. Nagpur Lok Sabha Elections 2024

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या निवासस्थानी माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार विकास ठाकरे यांनी नागपूरची लोकसभा निवडणूक लढवावी, यावर एकमत झाले. Nagpur Lok Sabha Elections 2024

याविषयीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह हायकमांडला कळविण्यात आला असून अंतिम निर्णय मात्र दिल्लीतच होणार आहे. स्वतः ठाकरे लढण्यास इच्छुक नाहीत. मध्यंतरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचे वेळी आ. विकास ठाकरे, आ. राजू पारवे यांची नावे चर्चेत होती. मात्र, त्यांनी इन्कार केला, आता पुन्हा या दोघांची नावे अनुक्रमे नागपूर व रामटेक मतदारसंघातून उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. दोघेही लढण्यास इच्छुक नसल्याने या दोन्ही मतदारसंघात उमेदवारीचे गूढ कायम होते. यावेळी सूचक म्हणून सतीश चतुर्वेदी यांनी त्यांचे नाव सुचवले. तर अनुमोदक म्हणून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नावाला अनुमोदन दिले.

नितीन कुंभलकर, प्रफुल्ल गुडधे यांचीही नावे चर्चेत आहेत. दरम्यान, नागपूरची लोकसभा निवडणूक आमदार विकास ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे तुल्यबळ होण्याची चिन्ह बळावली आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ऐन वेळेवर उमेदवारी देण्यात आल्यानंतरही नाना पटोले यांनी साडेचार लाखांवर मते घेतली. नागपुरात आमदार विकास ठाकरे यांचे शहराच्या विविध भागात संघटन आहे. बूथ, ब्लॉक पातळीवर त्यांच्या या नेटवर्कचा पक्षाला फायदा मिळू शकतो, भाजप विरोधात असलेल्या नाराजीचा काँग्रेसला फायदा मिळू शकतो, याबाबतीत यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी नागपूरचे दुसरे दावेदार आमदार अभिजीत वंजारी, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, प्रसन्न तिडके आदी नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button