नागपूर : खानगाव ग्रामपंचायतमधील ग्रामसेविका १२ हजारांची लाच घेताना जाळ्यात | पुढारी

नागपूर : खानगाव ग्रामपंचायतमधील ग्रामसेविका १२ हजारांची लाच घेताना जाळ्यात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सावनेर तालुक्यातील खानगाव ग्रामपंचायतमधील कचराकुंडीचे काम, अंगणवाडीमधील सिमेंट गट्टू बसविणे व गावातील सांडपाण्याच्या पाईपलाईनचे काम एका ठेकेदाराला मिळवून दिल्याबद्दल ग्रामसेविकेने पाच टक्के रक्कम अर्थात २० हजारांची लाच मागितली. तडजोडीनंतर ठेकेदाराकडून १२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या ग्रामसेविकेला सोमवारी अटक केली. रत्नमाला लोकसिंह हिरापुरे (४२ ,ग्रामपंचायत खानगाव, ता.सावनेर) असे या ग्रामसेविकेचे नाव आहे.

सावनेर तालुक्यातील खानगावात कार्यरत या ग्रामसेविका लाच घेतल्याशिवाय शेतकरी, मजूर आणि गावकऱ्यांचे काम करीत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी ठेकेदाराकडून ग्रामपंचायतमध्ये कचराकुंड्या लावण्याचे काम करून घेतले. त्यानंतर अंगणवाडीमधील सिमेंट गट्टू बसविण्याचे व गावातील सांडपाण्याचे पाईपलाईंनचे काम ठेकेदारास मिळवून दिल्याचे तसेच कामाचे पैसे साहित्य खरेदी केलेल्या दुकानदाराचे खात्यात लवकर जमा करून दिल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून तिनही बिलाचे एकत्रित रक्कम चार लाख रुपयाचे ५ टक्के प्रमाणे २०,००० रुपये ग्रामसेविका हिरापुरे हिने मागितली. पहिला टप्पा म्हणून ८ हजार रुपये लाच स्विकारली. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली. याप्रकरणी केळवद पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून ग्रामसेविकेच्या घराची झडती पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात प्रवीण लाकडे यांच्या पथकाने केली.

Back to top button