गडचिरोली : मार्कडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त भरली मोठी यात्रा | पुढारी

गडचिरोली : मार्कडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त भरली मोठी यात्रा

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज शिवलिंगाची पूजा-अर्चा करुन प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी यांनीही आज मार्कंडेश्वर आणि शिवलिंगाची पूजा केली.

या यात्रेत विविध शासकीय योजनांचे स्टॉल्स लावण्यात आले असून, स्वयंसेवी संस्थांनी भाविकांसाठी अन्न्दान आणि पाणपोईची व्यवस्था केली आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार असून, विदर्भासह शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने शिवलिंग आणि मार्कडेश्वराच्या दर्शनासाठी आले आहेत.

गडचिरोली आगाराने मार्कडादेव येथील यात्रेसाठी ६९ बसेसची व्यवस्था केली आहे. शिवाय अहेरी आणि चंद्रपूर आगारानेही अतिरिक्त बसेसची व्यवस्था केल्याने नागरिकांना सोयीचे झाले आहे.

मार्कडादेवसह चामोर्शी तालुक्यातील चपराळा, आरमोरी तालुक्यातील वैरागड आणि कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथेही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरल्या आहेत.

Back to top button