क्षणात होत्याचे नव्हते झाले…; वाघोली खुर्द येथे वादळी वाऱ्यासह पावसाने घराचे नुकसान | पुढारी

क्षणात होत्याचे नव्हते झाले...; वाघोली खुर्द येथे वादळी वाऱ्यासह पावसाने घराचे नुकसान

वाशिम : पुढारी वृत्तसेवा : वाशिम तालुक्यातील वाघोली खुर्द येथे बुधवारी (दि. १७) रोजी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने गावातील घरावरील पत्रे उडून, तर काही घरांच्या भिंती पडल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील हळद, कांदा, फळबागा, भाजीपाला वर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाघोली खुर्द येथे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम पाटील इढोळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या 

वाशिम तालुक्यातील तोंडगाव सर्कल अंतर्गत येणाऱ्या वाघोली खुर्द येथे बुधवारी दुपारी चार ते पाच वाजताच्या दरम्यान आलेल्या वादळी वाऱ्याने गावातील अनेक घरांवरची पत्रे उडून गेले. तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे. त्यामुळे गावातील अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत. या वादळी वाऱ्याने गावातील वीज वाहक तारांचे खांब देखील पडले. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. या वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढलेली हळद, कांदा, फळबागा, भाजीपाला यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यासंदर्भात होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.

क्षणात होत्याचे नव्हते झाले…

वाशिम तालुक्यातील वाघोली खुर्द येथे दुपारपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. मात्र, दुपारनंतर आलेल्या वादळी वाऱ्याने गावातील सर्व चित्रच बदलून गेले. अनेक घरांवरची टिनपत्रे उडून गेल्याने गावात एकच धांदल उडाली. काही घरांच्या भिंती पडल्याने नागरीक जीव मुठीत घेऊन सैरभैर झाले. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे या अचानक आलेल्या संकटाने क्षणात होत्याचे नव्हते झाले. ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राम पाटील इढोळे, सतीश इढोळे यांनी केलेल्या नुकसान पाहणी दरम्यान लक्षात आली.

जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी

वाघोली खुर्द येथे झालेल्या आपत्तीने गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने जिवित हानी झाली नाही. मात्र, याबाबत अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी लढा उभारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम पाटील इढोळे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे यांनी दिला आहे.

Back to top button