दहावीत 93.5 टक्के गुण पाहून भारावलेला विद्यार्थी झाला बेशुद्ध! | पुढारी

दहावीत 93.5 टक्के गुण पाहून भारावलेला विद्यार्थी झाला बेशुद्ध!

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये इयत्ता दहावीत आपल्याला मिळालेले गुण पाहून एका विद्यार्थ्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे. परीक्षेत मिळालेले गुण पाहून संबंधित विद्यार्थी चक्क बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. यानंतर पालकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

अंशुल कुमार असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अंशुल हा मेरठच्या मोदीपूरम् येथील महर्षी दयानंद इंटर कॉलेजमधील विद्यार्थी आहे. नुकत्याच पार पडलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्याला 93.5 टक्के गुण मिळवले. हे पाहून भारावून गेला आणि काही क्षणातच जमिनीवर कोसळला. यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अंशुलचे वडील सुनील कुमार हे पोस्ट ऑफिसमध्ये कंत्राटी कामगार असून त्यांनी इंडिया टुडेला ही घटना सांगितली. अंशुलचा चुलत भाऊ पुष्पेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये दाखल झाल्यानंतर अंशुलच्या प्रकृतीत सुधारणा झाली, तो अजूनही रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषदेने नुकताच यूपी बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 89.55 टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो किंचित कमी आहे.

Back to top button