Satara Lok Sabha | साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदे यांच्यात हायव्होल्टेज ड्रामा | पुढारी

Satara Lok Sabha | साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदे यांच्यात हायव्होल्टेज ड्रामा

हरीष पाटणे

अखेर महायुतीने उदयनराजे भोसले यांनाच सातारा लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दिल्याने उदयनराजे व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. मास आणि मसल लीडर्सची टस्सल या मतदार संघात महाराष्ट्राला पाहायला मिळेल. (Satara Lok Sabha)

सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ होता. मात्र, उदयनराजेंनी मतदार संघात केलेली तयारी, उमेदवारी मिळण्याआधीच निर्माण केलेले वातावरण व वापरलेले दबावतंत्र यशस्वी होऊन उदयनराजेंच्याच गळ्यात महायुतीने उमेदवारीची माळ टाकली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दोन दिवस अगोदरच आ. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. राष्ट्रवादीचे संस्थापक खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांनी विराट शक्तिप्रदर्शन करत सातार्‍यात उमेदवारी अर्जही दाखल केला. उदयनराजेंचा बालेकिल्ला असलेल्या सातारा शहरात आ. शशिकांत शिंदे यांनी केलेले शक्तिप्रदर्शन भुवया उंचावणारे आहे.

उदयनराजे व शशिकांत शिंदे यांच्यातील लढत एकतर्फी होणार नाही. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. स्ट्राँग मराठा लीडर म्हणून त्यांची ओळख आहे. उदयनराजेंचा चाहता वर्ग मोठा आहे. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजपची कोअर टीम उदयनराजेंसोबत आहे. भाजपने मधल्या काळात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे तालुक्यांमध्ये नेऊन बुथ यंत्रणा गतिमान केली आहे. त्याचा फायदा उदयनराजेंना होऊ शकतो. महायुतीची आमदार संख्या सातारा लोकसभा मतदार संघात व सातारा जिल्ह्यात जास्त आहे. पालकमंत्री व पाटणचे आ. शंभूराज देसाई, सातारा-जावलीचे आ. शिवेंद्रराजे भोसले, कोरेगाव-खटावचे आ. महेश शिंदे, महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आ. मकरंद पाटील, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, माजी आमदार मदनदादा भोसले या मतदार संघातील नेत्यांचा उदयनराजेंना पाठिंबा मिळणार आहे. याशिवाय मतदार संघाबाहेर असले तरी जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांचाही उदयनराजेंना पाठिंबा राहणार आहे. उदयनराजेंची सर्वात जमेची बाजू म्हणजे शिवेंद्रराजेंसोबत त्यांचे झालेले मनोमीलन. शिवेंद्रराजेंची टीम अ‍ॅक्टिव्हपणे उदयनराजेंच्या प्रचारात दिसत आहे. भाजपच्या संपूर्ण केडरने उदयनराजेंची निवडणूक हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या दोन्ही घटकपक्षांनी उदयनराजेंचे काम प्रामाणिकपणे केले तर उदयनराजेंसाठी ही निवडणूक सोपी जाणार आहे.

दुसर्‍या बाजूने आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठी शरद पवारांविषयीची मतदार संघात असलेली सहानभूती सर्वात जमेची बाजू आहे. 1952 पासून आजपर्यंत हा मतदारसंघ काँग्रेस विचारांचा राहिला आहे. 1996 चा अपवाद वगळता सातारा लोकसभा मतदार संघावर आधी स्व. यशवंतराव चव्हाण व नंतर शरद पवार यांचाच पगडा राहिला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या मानसिकतेत आहेत. किंबहुना त्यामुळेच त्यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनिवास पाटील यांच्याविषयी मतदार संघात असलेली सहानुभूती, आ. बाळासाहेब पाटील यांचे असलेले नेटवर्क स्वत: शशिकांत शिंदे यांचा जिल्ह्यात असलेला जनसंपर्क, माथाडी कामगारांचे नेते म्हणून शशिकांत शिंदे यांची असलेली इमेज हे त्यांचे प्लस पॉईंट आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पराभवानंतरही ते लोकांमध्ये होते, त्यामुळेच उमेदवारी अर्ज भरतानाच उदयनराजेंच्या सातारा शहरात ते एवढी गर्दी करू शकले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या विरोधात असलेले लोक शशिकांत शिंदे यांना मिळालेले आहेत. कोणत्या तरी एका राष्ट्रवादीचा उमेदवार आहे ना, असे समजून काही जण आतल्या हाताने शशिकांत शिंदे यांचे काम करत आहेत. निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतशी शशिकांत शिंदे यांनी प्रचारात गती घेतली, आणि मतदार संघात चारही बाजूने शरद पवार यांच्या सभा झाल्या, तर उदयनराजेंसाठी ही निवडणूक अटीतटीची होईल. 2019 च्या पोटनिवडणुकीत पवारांनी ऐनवेळी मॅच फिरवली होती. शशिकांत शिंदेंनाही तेच मॅजिक पुन्हा करायचे आहे. त्यासाठी अंतिम क्षणी मैदानावर पुन्हा एकदा पवार उतरतील. शशिकांत शिंदे यांच्यासाठी सहानुभूतीचा फॅक्टर कितपत उपयोगी पडतो, हे पाहणे त्यामुळेच औत्सुक्याचे आहे.

उदयनराजे व शशिकांत शिंदे हे दोघेही मास व मसल लीडर आहेत. दोघांनी यापूर्वीही अनेकदा एकमेकांना टस्सल दिली आहे. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात एकमेकांवर टीका-टिपणी सुरू झाली आहे. उदयनराजेंनी आ. महेश शिंदे यांच्या माध्यमातून मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा हातात घेतला आहे. तर महाविकास आघाडीने मुंबईतून आ. जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून लेवे खून खटल्यावर भाष्य केले आहे. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात वादग्रस्त मुद्द्यांना हात घातला गेल्याने निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापर्यंत सातार्‍याची लढत कोणत्या थराला जाईल, हे विश्लेषकांनाही सांगता येणार नाही. उदयनराजे ज्या ताकतीने उतरले आहेत, त्याच ताकतीने आ. शशिकांत शिंदेही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रबळ राजकीय नेत्यांची लढाई अटीतटीची होईल, असेच चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी शरद पवार, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत विराट गर्दीने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून उदयनराजेही देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उदयनराजेही शशिकांत शिंदेंच्या तिप्पट गर्दी करण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारी अर्ज भरतानाची गर्दी हा निकाल नसतो. बुथवर तुम्ही जे काम केले आहे. प्रचारामधील वातावरण निवडणुकीपर्यंत कसे नेले आहे, त्यावर निकाल अवलंबून राहतो. या प्रक्रियेत उदयनराजे व शशिकांत शिंदे यात कोण बाजीगर ठरतो, हे पाहणे त्यामुळेच उत्सुकतेचे आहे. (Satara Lok Sabha)

हेही वाचा 

Back to top button