मांजराच्या चुकीमुळे घर गेले जळून! | पुढारी

मांजराच्या चुकीमुळे घर गेले जळून!

बीजिंग : चिन्यांच्या अजब देशातील हे नवे कोरे अजब! तिथे एका मांजराच्या चुकीमुळे अख्खे घर जळून गेले. या मांजराने चुकून मालकाच्या किचनमधील इंडक्शन कुकर सुरू केला. त्यामुळे घराला आग लागली आणि या आगीत एक लाख युआन म्हणजेच 11 लाख 67 हजार रुपयांचे नुकसान झाले!

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की मांजराच्या मालकाला 4 एप्रिलला त्याच्या प्रॉपर्टी मॅनेजमेंट स्टाफकडून फोन आला. त्यांनी सांगितले की तुमच्या घराला आग लागली आहे. हे ऐकताच मालक तातडीने नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतातील आपल्या फ्लॅटमध्ये पोहोचला. त्याच्या लक्षात आले की हा प्रकार मांजरामुळेच घडला आहे.

जिंगोडियाओ नावाचे हे मांजर किचनमध्ये खेळत होते. त्याने चुकून इंडक्शन कुकरच्या टच पॅनेलवर पाय ठेवला. त्यामुळे कुकर सुरू झाला आणि मोठी आग लागली. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांना हे ब्रिटिश शॉर्टहेअर प्रजातीचे मांजर वरच्या मजल्यावर एका कॅबिनेटमध्ये लपून बसलेले दिसले. त्याच्या अंगावरही बरीच राख होती. सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नव्हती. अर्थात मालकाने आगीची जबाबदारी मांजरावर नव्हे तर स्वतःवरच घेतली आहे. त्याने सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले की आग लागण्याला तोच जबाबदार आहे. याचे कारण म्हणजे त्याने कुकरचा स्वीच बंद करणे विसरले होते.

Back to top button