‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, राज ठाकरे यांची उपस्थिती | पुढारी

'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, राज ठाकरे यांची उपस्थिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘गीतरामायणा’तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी ‘बाबुजीं’नी मराठी मनावर राज्य केले. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील टीमसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील ’गीतरामायण’मधील बहारदार गाण्यांची झलकही पाहायला मिळाली.

हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. या चित्रपटात एकूण २७ गाणी असून या चित्रपटाच्या माध्य्मातून प्रेक्षकांना संगीत नजराणा मिळणार आहे.

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केला असून कथा, पटकथा, संवादही त्यांचेच आहेत.

राज ठाकरे ट्रेलरचे कौतुक करताना म्हणाले, ‘’मला बाबुजींचा सहवास फारसा लाभला नाही. परंतु माझ्या वडिलांचे आणि बाबुजींचे जवळचे संबंध होते. बाबुजींना जवळून भेटण्याचा योग आला नाही. बहुदा हा योग सुनिल बर्वेंमुळे येईल. बाबुजींची सगळीच गाणी अजरामर आहेत. त्यांच्या गाण्यांची खासियत म्हणजे एखाद्याला नवसंजीवनी देणे. उभारी देणे. मला खात्री आहे, या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळेल.’’

दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ‘आजचा हा दिवस खूपच आनंददायी आहे. कलाप्रेम राज ठाकरे यांच्या उपस्थितीने या सोहळ्यात अधिकच रंगत आणली. फडके आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे संगीत क्षेत्रातील योगदान सर्वश्रुतच आहे. परंतु इथंवर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास तसा खडतर होता. त्यांच्या या प्रवासात पत्नी ललिताबाई, ग. दि. माडगुळकर हे त्यांच्या सोबत होतेच. परंतु या प्रवासात त्यांना इतर अनेकांनी साथ दिली. त्यांच्या भावसंगीताचा हा रंजक प्रवास या चित्रपटातून मांडण्याचा आमचा प्रयत्न केला आहे.’’

Back to top button