वाशिम : सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करणारा फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

वाशिम : सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करणारा फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष आहे. कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. सोशल मीडिया माध्यमांचा दुरुपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व घटना घडल्यापासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात मंगरूळपीर पोलिसांना यश आले आहे.

मंगरूळपीर येथे दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या Whatsapp वर सामाजिक तेढ निर्माण होईल असे स्टेटस ठेवले होते. सदर आरोपी हा २ महिन्यांपासून फरार होता. मंगरूळपीरचे पोलीस पथक सतत त्याच्या मागावर होते.

सदर आरोपी हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाल्याने पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी किशोर लांडकर (रा.मोझरी, ता.मंगरूळपीर, जि.वाशिम) याला ताब्यात घेतले. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे हे करत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.सुधाकर आडे, सपोनि.निलेश शेंबडे, पोउपनि.संतोष आघाव, पोहेकॉ.अमोल मुंदे, पोकॉ.राम राऊत, मंगेश गादेकर, मोहम्मद परसूवाले, विठ्ठल उगले, बबन अंभोरे यांनी पार पाडली.

‘नागरिकांनी सोशल मीडीयाचा गैरवापर टाळावा अन्यथा सामाजिक शांतता बिघडवू पाहणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये व तसे अफवा पसरविणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश पुढे फॉरवर्ड करू नये.’ असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (IPS) यांनी केले आहे.

हेही वाचा;

Back to top button