Ashes 2023 : सामना दोन रणनीतींचा | पुढारी

Ashes 2023 : सामना दोन रणनीतींचा

कसोटी क्रिकेटला सर्वोच्च दर्जाचे क्रिकेट का म्हणतात आणि कसोटी क्रिकेटचे भवितव्य काय, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अ‍ॅशेसच्या एजबॅस्टनच्या पहिल्या कसोटीत मिळाली. इतके चढ-उतार असलेला हा सामना अखेर ऑस्ट्रेलियाने दोन गडी राखून जिंकला आणि मालिकेत आघाडी मिळवली, पण हा सामना नुसता इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या क्रिकेटच्या जन्मापासूनच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांत नव्हता तर तो सामना होता या क्रिकेटच्या दोन रणनीतींमध्ये. (Ashes 2023)

ब्रॅन्डन मॅकलम इंग्लिश संघाचा प्रशिक्षक झाल्यापासून इंग्लंडच्या क्रिकेट विचारसरणीत आमूलाग्र बदल झाला आणि ब्रॅन्डनच्या ‘बॅझ’ या टोपण नावावरून ‘बॅझबॉल’ या क्रिकेटपद्धतीचा उदय झाला. इंग्लंडच्या पराभवाच्या मालिकेतून उद्विग्न होऊन जो रुटने कर्णधारपद सोडल्यावर नवा कर्णधार बेन स्टोक्स आणि नवा प्रशिक्षक मॅकलम यांनी संघ तोच ठेवत इंग्लंडला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढून विजयाच्या मार्गपथावर नेले. इंग्लंडने सामने जिंकायचा सपाटा लावला आणि परंपरागत एमसीसी कोचिंग मॅन्युअलचे इंग्लिश क्रिकेट कात टाकत नव्या रूपात उभे राहिले. या बॅझबॉल पद्धतीत मुख्य वैशिष्ट्य म्हणजे फलंदाजी असो वा गोलंदाजी करत असताना सकारात्मकता बाळगली जाते. कुठच्याही दडपणाखाली किंवा पराभवाच्या भीतीच्या छायेत न राहता काहीही करून जिंकण्याची तीव्र इच्छा जोपासली जाते. हे करायला पूरक म्हणजे सोप्या भाषेत हेतू सांगणे आणि छोट्या चांगल्या कामाला दाद देणे. तसे बघायला गेले तर वरवर हे सोपे वाटते. मात्र, अमलात आणायला मानसिक बदल फार महत्त्वाचा आहे. या कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर झॅक क्रॉवलीने खणखणीत चौकार मारून या बॅझबॉलची ओळख करून दिली. पहिल्या दिवशी सकारात्मक फलंदाजी करत 393 वर डाव घोषित केला. आता इंग्लंड हरल्यावर या डाव घोषित करण्याच्या निर्णयावर बरीच उलटसुलट चर्चा होईल. तथापि, बेन स्टोक्सने जे केले ते योग्य होते. कारण, चार षटकांत ऑस्ट्रेलियाचा बळी मिळवणे हा एक उद्देश त्यामागे होता. त्याचबरोबर इतक्या धावा आम्हाला पुरेशा आहेत हा नकळत संदेशही त्यात लपला होता. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही डावांसाठी इंग्लंडने जी गोलंदाजी केली ती याच सकारात्मक वृत्तीची होती. धावा रोखून नाही तर वीस बळी मिळवून सामना जिंकता येतो हे जाणून त्यांनी शॉर्ट लेग, लेग स्लिप, शॉर्ट मिडऑफसारखे आक्रमक क्षेत्ररक्षण लावून आखूड टप्प्याच्या गोलंदाजीला लेग साईडचा सापळा लावला. जोपर्यंत या वृत्तीने विजय मिळतो तेव्हा सगळे बरोबर वाटते. जेव्हा आठवा बळी कॅरीच्या रूपाने मिळाला तेव्हा सामना इंग्लंडने जिंकल्यात जमा होता. कारण, 54 धावा अजून हव्या होत्या. इंग्लंडकडे नव्या चेंडूचा पर्याय होता. आकाशही ढगाळ होते. म्हणजे सर्व बाजू इंग्लंडच्या बाजूने होत्या. मात्र, सामना इथेच फिरला तो ऑस्ट्रेलियाच्या रणनीतीने. (Ashes 2023)

उस्मान ख्वाजाची कमाल

एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ वेगवान क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध होता. कसोटी सामन्यात त्यांची धाव-सरासरी सहज साडेचार असायची. आता हा नवा ऑस्ट्रेलियन संघ कसोटीत जास्तीत जास्त वेळ खेळून प्रतिस्पर्ध्याला दमवून मग त्याला कोंडीत गाठत हल्ला करायच्या रणनीतीनुसार खेळतो. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा पहिले तिघे खंदे फलंदाज आदल्या दिवशी तंबूत परतले होते तरीही उस्मान ख्वाजाच्या जोडीला हेड, ग्रीन, कॅरी हे 174 धावा करायला पुरेसे होते. ऑस्ट्रेलिया त्यांच्या जुन्या पद्धतीने खेळले असते तर कदाचित चाळीस षटकांतही त्यांनी या धावा केल्या असत्या. तथापि, पावसाने एक सत्र वाहून गेल्यावरही ऑस्ट्रेलियाने पहिल्या तासात फक्त 21 धावा केल्या. जो रुट सारख्या कामचलाऊ गोलंदाजावरही ते तुटून पडेल नाहीत. त्याच्या पहिल्या बारा षटकांत कांगारूंनी एकही चौकार वसूल केला नाही. याला कारण म्हणजे कसोटी जास्तीत जास्त खेचायची आणि मग निर्णायक क्षणी हल्लाबोल करायचा ही त्यांची रणनीती. अर्थात, ती राबवायला त्यांच्याकडे कसोटी तंत्र घोटवलेले फलंदाज आहेत. उस्मान ख्वाजा या कसोटीत पाचही दिवस खेळपट्टीवर होता. त्याने दुसरा संपूर्ण दिवस खेळून काढला. बॉक्सिंगच्या लढतीत कुणी नॉक-आऊट पंच एकदाच लगावतो तर कुणी प्रतिस्पर्ध्याचे आक्रमण नुसते थोपवून त्याला पहिले दमवतो आणि मग हल्लबोल करतो. ऑस्ट्रलियाचे सध्याचे क्रिकेट हे या दुसर्‍या प्रकारात मोडते.

ख्वाजाने कसोटी शेवटपर्यंत खेचली. मात्र, कसोटीत एकूण 518 चेंडू खेळल्यावर त्याचे पाय थकले आणि तो बाद झाला. हाच तो क्षण आणि हीच ती वेळ नक्की करून कमिन्स आणि कॅरी इंग्लंडचे बॅझबॉल क्रिकेट खेळायला लागले. कॅरीला जमले नाही, पण कमिन्सने रुटवर हल्लाबोल केला. नवा चेंडू घ्यावा का नाही, या संभ्रमात स्टोक्सला पाडले आणि लायनच्या मदतीने खंबीरपणे उभे राहून तो धावा जमवत गेला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा जीवनमरणाचा सामना असला तरी त्याने आणि लायनने ओठांवरील हसू कमी होऊन दिले नाही आणि स्टोक्सच्या चेहर्‍यावरची चिंता वाढवली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोघांच्या रणनीतीत फरक असला तरी यात डावे-उजवे असे काही नसते इतकेच आपण म्हणू शकतो ऑस्ट्रेलियाने पारंपरिक विचारधारा आणि योग्य वेळेला सकारात्मक आक्रमण केल्याने त्यांची बाजू किंचित वरचढ ठरली.

भारतासाठी मार्गदर्शक

हे सर्व बघताना आपल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याची आठवण होणे अपरिहार्य होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आपले कसोटी क्रिकेट किती गांभीर्याने घेते, रणनीती कशा आखतात हे बघून रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना शिकण्यासाठी भरपूर वाव आहे. त्याचप्रमाणे दोन्ही संघांचा समतोल उत्तम होता. 2025 ची जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना लॉर्डस्ला 2025 मध्ये होणार आहे. आजच्या संघाचा विचार करता आपण तिथपर्यंत पुन्हा पोहोचलो तर तेव्हा रोहित शर्मा, आर. अश्विन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे 36-38 वयोगटात असतील. या पहिल्या अ‍ॅशेस कसोटीने आपल्यालाही संघबांधणी आणि रणनीतीचे धडे नकळत मिळाले हे मान्यच केले पाहिजे.

– निमिष पाटगावकर

हेही वाचा;

Back to top button