चंद्रपूर जिल्ह्यातील धानपिके अवकाळीच्या विळख्यात : शेतकरी चिंताग्रस्त | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यातील धानपिके अवकाळीच्या विळख्यात : शेतकरी चिंताग्रस्त

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : मार्च महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. मेच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा अवकाळीचा जोर वाढलेला आहे. मंगळवारी रात्रभर चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळल्याने शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झालेला आहे. धानपिके हातून जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

अवकाळीमुळे पिकांसोबतच घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी विजा पडून जीवितहानी झाली आहे. तर गारपिटीमुळे पिके भूईसपाट झाली आहेत. अस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असतानाही अवकाळी वादळी पाऊस अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, सिंदेवाही, ब्रम्हपूरी, नागभीड, चिमूर आदी ठिकाणी उन्हाळी धानपिके घेण्याकरीता शेतकरी वळले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोंसेखूर्द प्रकल्पाच्या कालव्यामुळे ब्रम्हपूरी तालुक्यात शेतकरी उन्हाळी धानपिके घेत आहेत. नागभीड तालुक्यातील घोडाझरी प्रकल्पातील पाण्यामुळे नागभीड तालुक्यातील गोविंदपूर परिसरात धानाची लागवड करण्यात आली आहे.

तर अन्य ठिकाणी स्वत:च्या सिंचन सुविधेमुळे लागवड केली. सिदेवाही तालुक्यात सुमारे 2 हजार एकर मध्ये धानपिकांची लागवड झाली आहे. धान्याचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या सिंदेवाही व मुल मध्येही मोठ्या क्षेत्रावर उन्हाळी धानाची पेरणी करण्यात आली. ब्रम्हपूरी तालुक्यात गोसेखुर्द व वैनगंगा नदी काठावरील गावात धानपिक लावण्यात आले आहे. चिमूर, सावली मध्येही उन्हाळी धान लागवड करण्यात आली आहे. फेब्रवारी, मार्च महिन्यात लागवड करण्यात आलेली धानपीक कापणीला आले आहे. तर काही ठिकाणी पंधरवाड्यात कापणीला येणार आहे.

परंतु विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस दररोज रात्री कोसळत असल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. मार्चमध्ये गहू, चना फळबागांना फटका बसला. काही ठिकाणी उन्हाळी धान काढणीला आली आहेत. पण अवकाळीमुळे शेतकरी धान कापण्यास विलंब करीत आहेत. उभ्या असलेले धानपीक वादळामुळे खाली लोळायला लागली आहेत. काही पिके पंधवाड्यात कापायला येणार आहेत. अवकाळी पाऊस जर थांबला नाही, तर मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना समोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा 

Back to top button