ऐतिहासिक! प्रथमच लष्करात मुलींचा समावेश

ऐतिहासिक! प्रथमच लष्करात मुलींचा समावेश

[author title="आशिष देशमुख " image="http://"][/author]

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएत मे 2025 मध्ये इतिहास घडणार आहे. एनडीएच्या इतिहासात प्रथमच अधिकारी म्हणून 24 मुली प्रथमच लष्करात दाखल होणार आहेत. सध्या या मुली मुलांबरोबरीनेच भल्या पहाटे व्यायाम, खडतर सराव अन् अभ्यासात मग्न आहेत. पुण्यातील खडकवासलामध्ये 1949 मध्ये एनडीए संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून आजवर म्हणजे 24 मे 2024 रोजी 146 पदवीदान सोहळे पार पडले. पण, या संस्थेतून आजवर मुलांनाच प्रवेश होता. एनडीएत मुलींना अधिकारी होण्यासाठी प्रवेश दिला जात नव्हता. 2022 मध्ये सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला.

74 वर्षांनंतर मुलींना खुले झाले एनडीएचे द्वार

एनडीएमध्ये वर्ष 2022 मध्ये मुलींना प्रथमच प्रवेशाचे द्वार खुले करण्यात आले. देशभरातील हजारो मुलींनी ही स्पर्धा परीक्षा दिली. यातून 24 मुलींची निवड करण्यात आली. त्या मुलींनाही मुलांसारखाच हेअरकट ठेवावा लागतो. पहाटे चार वाजता व्यायामासाठी उठावे लागते. व्यायाम, परेडचा रगडा अन् दिवसभर अभ्यास, असे कष्ट या 24 मुली घेत आहेत. जानेवारी 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संस्थेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आल्या होत्या, तेव्हा त्यांच्यासमोर या मुलींच्या तुकडीने बहारदार संचलन केले. त्या भारावून गेल्या. त्यांनी या सर्व मुलींच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

लष्करप्रमुख पांडे यांनी केले कौतुक

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते 24 मे 2024 रोजी नुकताच एनडीएचा 146 वा पदवीदान सोहळा पार पडला. यात 24 मुलींनी बहारदार संचलन केले. तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला. एनडीएतील नारीशक्तीचे मी विशेष अभिनंदन करतो, असे उद्गार काढत त्यांनी मुलींचे कौतुक केले.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजात माहितीपट

एनडीएच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन आणि एनडीएच्या संयुक्त विद्यमाने एनडीएचा इतिहास आणि सध्याची माहिती देणारा सुंदर माहितीपट तयार झाला आहे. याला अमिताभ बच्चन यांनी आपला भारदस्त आवाज दिल्याने या माहितीपटाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यू-ट्यूबवर 'एनडीए डॉक्युमेंटरी' असे नाव सर्च केले की तो माहितीपट आपल्याला दिसतो.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएला नुकतीच 75 वर्षे झाली. या संस्थेला मोठी परंपरा आहे. या संस्थेने देशासाठी लष्करातील तीनही दलांना मोठे अधिकारी दिले आहेत. आता मुलींची पहिली तुकडी येथे तयार होत आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये एनडीए नवा इतिहास निर्माण करीत आहे. 148 व्या पदवीदान सोहळ्यात प्रथमच मुलींची पहिली बॅच लष्करात अधिकारी म्हणून दाखल होणार आहे.

– अजय कोचर, व्हाईस अ‍ॅडमिरल, माजी प्रमुख, एनडीए

आम्ही मुलींची एनडीएतील पहिली बॅच आहे. मुलांबरोबरीनेच आमचे प्रशिक्षण सुरू आहे. पहाटे उठून व्यायाम, परेड आणि अभ्यास सुरू आहे. आम्हाला आमचे तज्ज्ञ प्रशिक्षक अतिशय उत्साहाने हे प्रशिक्षण देत आहेत.

– हरसिमरन कौर, कॅडेट, एनडीए

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news