संशोधन : भारतीय शास्त्रज्ञाचा आंतरराष्ट्रीय सन्मान

संशोधन : भारतीय शास्त्रज्ञाचा आंतरराष्ट्रीय सन्मान

[author title="उदय कुलकर्णी" image="http://"][/author]

अवकाश संशोधन क्षेत्रातील योगदानामुळे श्रीनिवास कुलकर्णी यांना जगरातील अनेक सन्मान मिळत गेले. चांगला संशोधक किंवा खगोल अभ्यासक बनण्यासाठी नेमके कोणते गुण अंगी बाणवायला हवेत याविषयी त्यांची स्वतःची अशी मते आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा असा बारा लाख अमेरिकन डॉलर्सचा 'शॉ' पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने…

एसआरके हा शॉर्टफॉर्म कशाचा असे विचारले की, तरुण मुले-मुली पटकन शाहरुख खानचे नाव घेतील. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोल तज्ज्ञांच्या समुदायात मात्र एसआरके हा शॉर्टफॉर्म प्रा. श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी यांच्यासाठी वापरण्यात येतो. त्यांना नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा असा बारा लाख अमेरिकन डॉलर्सचा 'शॉ' पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा येत्या नोव्हेंबर महिन्यात सिंगापूर येथे होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे जन्मलेल्या प्रा. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या नावावर खगोल विज्ञानातील अनेक मूलभूत स्वरूपाचे शोध नोंदले गेलेले आहेत. मिल्की वे म्हणून ओळखल्या जाणार्‍या आकाशगंगेतील तार्‍यांच्या दरम्यान असणार्‍या मूलद्रव्यांचे स्वरूप काय, याचा शोध घेण्याबरोबरच प्रा. कुलकर्णींनी 'पल्सार' म्हणजेच स्पंदन पावणार्‍या तार्‍यांचा, ब्राऊन ड्वार्फस्चा, अवकाशातील गॅमा किरणांच्या विस्फोटांचा विशेष अभ्यास व संशोधन केलेले आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक क्षमतेच्या टेलिस्कोपकडून गोळा केल्या जाणार्‍या अवकाशातील सिग्नल्सचा शोध घेऊन त्यांचे विश्लेषण करण्यासाठीची उपकरणे विकसित करण्यासाठीसुद्धा ते ख्यातनाम आहेत.

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एकमताच्या शिफारशीमुळे लंडनमधील रॉयल सोसायटीने त्यांना 2001 मध्ये मानाची फेलोशिप प्रदान केली आहे. या कर्तृत्वाबद्दल कोल्हापूरवासीय मात्र काहीसे अनभिज्ञ आहेत. नाही म्हणायला रॉयल सोसायटीची फेलोशिप जाहीर झाल्यानंतर प्रा. कुलकर्णी भारतात आले तेव्हा कुरुंदवाडमध्ये म्हणजे त्यांच्या जन्मभूमीत त्यांचा एक छोटेखानी सत्कार झाला होता. प्रा. कुलकर्णी आजही कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि प्लॅनेटरी सायन्स या विषयासाठी निगडित आहेत. त्यांचे संशोधनाचे काम सुरूच आहे. जगभरातील अनेक संशोधन संस्थांशी आणि विद्यापीठांशी त्यांची नाळ कायमची जुळलेली आहे. 'नासा'च्या 'एक्झोप्लॅनेट सायन्स सेंटर'चे तसेच 'कॅल्टेक' ऑप्टिकल ऑब्झर्व्हेटरीजचे संचालकपदही त्यांनी भूषविलेले आहे.

1950 च्या दशकात कुरुंदवाडमध्ये डॉ. रामचंद्र कुलकर्णी हे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करीत होते. तीन मुलींच्या पाठोपाठ 1956 साली त्यांना जो मुलगा झाला तो म्हणजे श्रीनिवास. 'इन्फोसिस'चे नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि कन्नड, इंग्रजी व मराठी भाषेतील लेखिका सुधा मूर्ती यांचेही लहानपण काही काळ कुरुंदवाडमध्ये गेले. श्रीनिवास हे त्यांचे सख्खे भाऊ! श्रीनिवास यांचा जन्म कुरुंदवाडमध्ये झाला असला तरी त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मात्र कर्नाटकातील हुबळी येथे झाले. पदार्थ विज्ञान हा विषय घेऊन दिल्लीतील आयआयटीमधून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर खगोल विज्ञानात डॉक्टरेट करण्यासाठी श्रीनिवास यांनी अमेरिका गाठली ती कायमचीच. गंमत अशी की, ज्या 'कॅल्टेक'मध्ये त्यांना पीएच.डी.साठी प्रवेश मिळू शकला नव्हता, त्याच 'कॅल्टेक'मध्ये म्हणजे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कालांतराने श्रीनिवास अ‍ॅस्ट्रॉनॉमी डिपार्टमेंटचे चेअरमन बनले. तत्पूर्वी 1983 मध्ये बर्कले येथून कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या फाईन अ‍ॅस्ट्रॉनॉमी डिपार्टमेंटमधून त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली होती. दिल्लीमध्ये आयआयटीत असताना त्यांनी जो संशोधन प्रकल्प प्रयोगासाठी निवडला होता, त्याचाच फायदा त्यांना बर्कले येथे डॉक्टरेटसाठी प्रवेश मिळताना झाला.

खरे तर अमेरिकेत आपल्या अभ्यासक्रमासाठी परिश्रम घ्यायला सुरुवात केली तेव्हा कुलकर्णी यांना खगोल विज्ञानाची फारशी पार्श्वभूमी नव्हती. पण जे समजणार नाही ते कितीही प्राथमिक स्वरूपाचे असले तरी त्याबाबत विचारणा करून समजावून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. अल्पावधीतच त्यांची आकलन क्षमता आणि तीव्र बुद्धिमत्ता याची जाणीव त्यांच्या मार्गदर्शकांना व सहकार्‍यांना झाली. त्यांनी सर्वप्रथम 'मिल्की वे' या आकाशगंगेतील हायड्रोजन वायूचे स्वरूप आणि विभागणी यावर काम सुरू केले. यासाठी पोर्टो रिको येथे असलेल्या एका मोठ्या रेडिओ टेलिस्कोपमधून केल्या जाणार्‍या निरीक्षणांचा उपयोग कुलकर्णींना करून घ्यावा लागला. अशाच अभ्यासासाठी पोर्टो रिकोला कुलकर्णी एकदा गेले असताना त्यांना अवकाशातून येणार्‍या रेडिओ सिग्नल्सपैकी विशिष्ट रेडिओ सिग्नल्सचा मूळ स्रोत कुठे आणि कसा असू शकेल याबाबत विचारणा करण्यात आली. कुलकर्णींनी मनःपूर्वक हा शोध घेतला आणि हा मूळ स्रोत म्हणजे एक स्पंदन पावणारा तारा (पल्सार) असल्याचे स्पष्ट झाले. कुलकर्णींच्या नावावर 1982 मध्ये या पल्सारचा शोध नोंदला गेला.

सूर्यापेक्षा कितीतरी पट मोठा तारा विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतो, त्याच्यामधील आण्विक इंधन संपुष्टात येऊ लागते आणि त्याच्या केंद्रभागाचे रूपांतर न्यूट्रॉन स्टारमध्ये होऊ लागते तेव्हा या तार्‍याचा बाह्य भाग विस्फोटांसह नाहीसा व्हायला लागतो. अशा स्थितीत असणार्‍या तार्‍याला सुपर नोव्हा असे संबोधण्यात येते. एखाद्या तार्‍याचा केंद्रभाग न्यूट्रॉन स्टार बनतो म्हणजे त्याचा फक्त न्यूट्रॉनने बनलेला भाग शिल्लक राहतो. उदा. सूर्याच्या वजनाच्या दीडपट वजन आणि केवळ दहा किलोमीटरचा व्यास असे रूप एखाद्या तार्‍याने धारण केले असेल तर त्याला न्यूट्रॉन स्टार म्हणून ओळखण्यात येते. अशा तार्‍याचे चुंबकीय क्षेत्र हे खूपच प्रभावी असते आणि तारा स्वतःभोवती वेगाने फिरत असताना त्यातून सतत ऊर्जा बाहेर फेकली जाते. असा न्यूट्रॉन तारा तरुण असतो तेव्हा त्याच्याकडून बाहेर फेकल्या जाणार्‍या ऊर्जेत काही रेडिओ तरंगांचाही समावेश असतो.

हा रेडिओ तरंगांचा झोत नेमकेपणे पकडता आला व अभ्यासता आला तर त्यातून अवकाशातील न्यूट्रॉन स्टार किंवा पल्सार यांचा शोध लागू शकतो. अवकाशातील अशा पल्सारचा पहिल्यांदा शोध 1967 मध्ये लागला होता आणि श्रीनिवास कुलकर्णी व त्यांच्या सहकार्‍यांनी 'पीएसआर 1937+21' या नावाने ओळखला जाणारा पल्सार शोधला तो 1982 मध्ये. असा तारा 1.6 मिली सेकंदात स्वतःभोवती गिरक्या घेत असतो म्हणजे सूर्यापेक्षा अधिक वस्तुमान असणारा तारा दर सेकंदाला स्वतःभोवती 625 गिरक्या घेत असतो. यापेक्षा जास्त वेगाने गिरक्या या तार्‍याला सहन होत नाहीत. हळूहळू या गिरक्यांचा वेग कमी होत जातो.

एकदा असा काही शोध नावावर लागल्यानंतर कुलकर्णींनी पल्सारवरच अधिक काम सुरू केले. त्यांनी पल्सारच्या चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास केला. पल्सारची निर्मिती खगोलीय प्रणालींमध्ये कशा पद्धतीने होत जाते याविषयी खूपशी नवी माहिती जगासमोर आणली. यानंतर कुलकर्णींच्या नावावर शोध जमा झाला तो ब्राऊन ड्वार्फस् म्हणून ओळखल्या जाणार्‍या अवकाशातील एका वेगळ्या गोष्टीचा. अवकाशातील ब्राऊन ड्वार्फस्चे वस्तुमान तो तारा बनण्यासाठी पुरेसे नसते आणि ग्रह म्हणून त्याची घडण व्हायची तर त्यासाठी ते वस्तुमान खूपच जास्त असते. तारे काय किंवा ब्राऊन ड्वार्फस् काय यांची घडण ही इंटर स्टेलर क्लाऊडस्च्या टकरावातून होत असते.

कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सर्वात प्रथम निःसंदिग्धपणे ब्राऊन डॉर्फचे अस्तित्व जगासमोर आणले. त्यांनी शोधलेल्या पहिल्या ब्राऊन ड्वार्फस्चे नाव 'ग्लिज 229 बी'. पृथ्वीपासून 19 प्रकाशवर्ष दूर असलेल्या एका तार्‍याच्या जोडीने हा ब्राऊन ड्वार्फ अवकाशात भ्रमण करीत असल्याचे कुलकर्णींना आढळले. माऊंट पालोमर येथील 60 इंची टेलिस्कोपमधून या ब्राऊन ड्वार्फस्च्या अस्तित्वाचा माग मिळाल्यानंतर त्यांनी 200 इंची टेलिस्कोपच्या माध्यमातून पाठपुरावा करत या ब्राऊन ड्वार्फस्चे अस्तित्व सिद्ध केले. पुढे हबल स्पेस टेलिस्कोपमुळे त्याच्याविषयीची आणखी माहिती मिळत गेली. यानंतर कुलकर्णींनी अवकाशातील गॅमा रे विस्फोटांचा पद्धतशीर अभ्यास सुरू केला. या अभ्यासात मोठी मदत झाली ती डच-इटालियन कृत्रिम उपग्रह बेप्पो एस.ए.एक्स. याच्या प्रक्षेपणानंतर. त्याच्या मदतीने जीआरबी 970228 म्हणून ओळखल्या जाणार्‍या गॅमा रे विस्फोटाबाबतचा शोध कुलकर्णी व त्यांच्या सहकार्‍यांनी 1997 मध्ये घेतला.

श्रीनिवास कुलकर्णींच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील अशा योगदानामुळे जगभरातील अनेक सन्मान त्यांना मिळत गेले आहेत आणि तो सिलसिला आजही सुरू आहे. इतकी तीव्र बुद्धिमत्ता असणार्‍या भारतीय संशोधकांनी परदेशातच स्थायिक होणे का पसंत करावे याविषयी 23 वर्षांपूर्वी मी त्यांना छेडले असता प्रा. कुलकर्णी यांनी एकूणच भारतीय संशोधन संस्थांमधील अपारदर्शकता, छोट्या-मोठ्या गोष्टी आणि नेमणुकांमध्येसुद्धा होणारे राजकीय हस्तक्षेप या बाबी कोणाही संशोधकाला उबग आणणार्‍या ठरतात आणि त्यामुळेच आपण भारतात न परतण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते.

पूर्वी अनेक चांगले खगोल अभ्यासक होऊन गेले असताना भारतात खगोल विज्ञान लोकप्रिय का नाही असे विचारले असता कुलकर्णी म्हणाले होते, याचे एक प्रमुख कारण म्हणजे शालेय अभ्यासक्रमात या विषयाला भारतामध्ये फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून तर हा विषय जवळपास गायब आहे. अमेरिकेत मात्र बरोबर याच्या उलट स्थिती आहे.

चांगला संशोधक किंवा खगोल अभ्यासक बनण्यासाठी नेमके कोणते गुण अंगी बाणवायला हवेत याविषयीही कुलकर्णींची स्वतःची अशी मते आहेत. ते म्हणतात, कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण साधारण सारखेच असतात. आपल्याला काय करायचे आहे याबाबत तुमचा द़ृष्टिकोन स्वच्छ हवा. तुम्हाला तुमच्या क्षमता नेमकेपणाने ओळखता यायला हव्यात आणि तुम्हाला तुमच्यातील कमकुवतपणाही पक्का माहीत हवा. हे केले तर तुमच्यात फाजिल आत्मविश्वासही निर्माण होणार नाही किंवा अकारण न्यूनगंड वाढीला लागणार नाही आणि तुम्ही यशस्वी होण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू कराल!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news