चंद्रपूर: बाजार समिती निवडणूक; पोंभुर्णा महाविकास आघाडीकडे: गोंडपिपरीमध्ये भाजपची सत्ता | पुढारी

चंद्रपूर: बाजार समिती निवडणूक; पोंभुर्णा महाविकास आघाडीकडे: गोंडपिपरीमध्ये भाजपची सत्ता

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदार संघातील पोंभूर्णा बाजार समितीमध्ये काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीच्या पॅनलने सत्ता बळकावली. 18 पैकी 12 जागांवर विजय मिळविला. तर भाजप प्रणीत शेतकरी आघाडीला फक्त 6 जागा मिळविता आल्या. तर गोंडपिपरी बाजार समितीत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. दोन्ही बाजार समित्यांमध्ये सत्तेची उलथापालथ झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील 12 पैकी उर्वरित 3 बाजार समित्यांची रविवारी (दि.३०) निवडणूक पार पडली. त्यामध्ये पोंभूर्णा बाजार समितीचा समावेश आहे. रविवारी रात्री हाती आलेल्या पोंभूर्णा बाजार समितीच्या निकालाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धक्का बसला आहे. पोंभुर्णा बाजार समिती निवडणुकीत भाजप प्रणीत शेतकरी आघाडी पॅनलने निवडणूक लढविली.

प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी प्रणित पॅनल उभी होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजप प्रणीत शेतकरी आघाडीला पराभूत केले आहे. महाविकास आघाडीने 12 जागांवर विजय मिळविला. तर भाजप प्रणित शेतकरी आघाडीला केवळ 6 जागा जिंकता आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. बारा जागेवर विजय मिळवित भाजप प्रणीत पॅनलची सत्ता उलथवून लावली.

नागभीड बाजार समिती वगळता भाजप प्रणित पॅनलने कुठेही एकहाती सत्ता मिळविली नाही. चंद्रपूर, चिमूर व राजूरा बाजार समित्यांध्ये काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. पोंभूर्णा हा भाजपचा गड समजला जातो. त्यामुळे या गडातील पोंभूर्णा बाजार समितीवर भाजप प्रणीत शेतकरी आघाडीची सत्ता येण्याचे दावे केले जात होते. परंतु त्या दाव्यांना काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीने धक्का दिला.

गोंडपिपरी येथे बाजार समितीच्या स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता होती. मात्र यावेळी काँग्रेसच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावला आहे. काँग्रेसची सत्ता उलथवून आपली एकहाती सत्ता स्थापन केली आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी गोंडपिपरी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून विजयोत्सव साजरा केला.

हेही वाचा

Back to top button