मनोरंजन : कायापालटाचे रहस्य

मनोरंजन : कायापालटाचे रहस्य

[author title="सोनम परब, सिनेअभ्यासक" image="http://"][/author]

गेल्या काही दिवसांत अभिनेता राजकुमार राव सोशल मीडियावर ट्रोल झाला. याचे कारण म्हणजे प्लास्टिक सर्जरीचा संशय. प्रत्यक्षात त्याने चेहरा साफ आणि आकर्षक दिसण्यासाठी स्किन फिलर इंजेक्ट केले होते. स्किन फिलर्सचा वापर हा नवीन नाही. अनेक दशकांपासून त्याचा वापर हॉलीवूड आणि बॉलीवूडचे कलाकार करत आले आहेत.

अभिनेता राजकुमार राव हा काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सच्या रडारवर आला. कारण होते चित्रपट 'श्रीकांत'मधील त्याचा लूक. या लूकसाठी त्याने प्लास्टिक सर्जरी केल्याची अफवा पसरली. मग काय, ट्रोलर्स त्याच्या मागे हात धुऊन लागले. प्रारंभी काही दिवस तो शांत बसला. त्यामुळे त्याचे मौन अफवा पसरविण्यास आणखीनच कारणीभूत राहिले. अखेर नाका-तोंडात पाणी गेल्याने रावला याबाबत पुढे येत लूकबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. तो म्हणाला, चेहरा खडबडीत राहिल्याने आणि ओठ थोडे जाड असल्याने चेहरा बारीक दिसत नव्हता. या चित्रपटातील पात्राला तो चेहरा फिट बसत नव्हता. त्यामुळे प्लास्टिक सर्जरी नाही तर स्किन फीलर्स करण्याचा निर्णय घेतला. राव म्हणतो, आठ वर्षांपूर्वी मी काही प्रमाणात फिलर्स केले होते. मला चित्रपटात भारदस्त आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेला चेहरा दाखवायचा होता. नंतर काही गरज भासली नाही. वास्तविक स्किन फिलर्स प्रक्रिया म्हणजे जेलसारख्या पदार्थाला त्वचेखाली इंजेक्ट करण्यात येते. त्यामुळे त्वचेत हायक्लूरोनिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. त्वचेत ओलसरपणा जाणवू लागतो. सुरकुत्या, ओबडधोबडपणा कमी होतो. साहजिकच त्वचेला नैसर्गिक रूपाने सॉफ्ट लूक मिळतो.

स्किन फिलर्सचा वापर हा नवीन नाही. अनेक दशकांपासून त्याचा वापर हॉलीवूड आणि बॉलीवूडचे कलाकार करत आले आहेत आणि सामान्य लोक देखील चांगला लूक मिळवण्यासाठी स्किन फिलर्सची प्रक्रिया करत राहतात. यामुळे त्वचा आणि चेहर्‍यावरील सुरकुत्या गायब होतात आणि मोठ्या सुरकुत्या कमी होऊन त्या लहान होतात. अर्थात ही स्थिती कायम राहात नाही. कायमस्वरूपी चेहर्‍यावर ताजेपणा दिसण्यासाठी अधूनमधून फिलर्स करावे लागते. राजकुमार रावच्या मते, आजच नाही तर अनेक वर्षांपूर्वी त्याने स्किन फिलर्सचा वापर केला होता. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलखतीत या प्रयोगाचा त्याने उल्लेख केला होता. स्किन फिलर्सची माहिती उघड होताच प्रेक्षकांनी हुर्रेबाजी करण्यास सुरुवात केली. त्यावर तो पुन्हा कॅमेर्‍यासमोर येत राजकुमारने मी एकटाच नाही तर अनेकांनी चीनमध्ये स्किन फिलर्स केल्याचे दाखले दिले. चीनमध्ये बहुतांश नागरिक स्किन फिलर्स करतात आणि याचा थांगपत्तादेखील कोणाला लागत नाही. रावच्या मते, अभिनय हे असे माध्यम आहे की, तिथे चेहरा आकर्षक असणे गरजेचे असते अणि त्यामुळे बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडच्या कलाकारांनी तरुण दिसण्यासाठी नेहमीच या प्रक्रियेचा वापर केला आणि तो एक नाईलाज असतो.

प्लास्टिक सर्जरी आणि स्किन फिलर्समध्ये फरक आहे. प्लास्टिक सर्जरीनंतर चेहर्‍यात आमूलाग्र बदल दिसतो आणि सहजपणे कोणाच्याही लक्षात येऊ शकतो. उदा. श्रीदेवी आणि शिल्पा शेट्टी यांनी नाकावर शस्त्रक्रिया केली होती. दोघींचे नाक खुजे असल्याने ते सरळ दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होती. अर्थात हा बदल सर्व प्रेक्षकांना लगेचच जाणवला. काही कलाकार तर हेअर विव्हिंगही करतात. त्यामुळे प्लास्टिक सर्जरची चर्चा नेहमीच झाली आहे. परंतु स्किन फिलर्समध्ये एवढा फरक जाणवत नाही. सुरकत्या पडलेल्या चेहर्‍यावर थोडासा ताजेपणा दिसतो आणि तो अधिक चमकदार राहतो. लोकांना हा नैसर्गिक बदल वाटतो. स्किन फिलर्स केल्याने चेहर्‍यात बदल जाणवत नाही. हा एकप्रकारचा मेकअपच असून चित्रपट उद्योगातील सर्व कलाकार त्याचा वापर करतात. हॉलीवूडमध्येही त्याचे प्रस्थ आहे. सिंडी क्रॉफर्डपासून किम कार्दशियाँ आणि मिकी मिनाजपासून निकोल किडमनपर्यंत हॉलीवूडच्या सर्व नायिकांनी स्किन फिलर्स केले आहे.

काही दिवसांपूर्वी हॅलबेरी कंपनीने एक निवेदन जारी केले आणि त्यानुसार हॉलीवूडच्या नायिका तरुण दिसण्यासाठी दरमहा लाखो डॉलर खर्च करतात. त्यांच्या मते, अशा प्रकारचा मेकअप करत आपल्या आरोग्याची एकप्रकारे हेळसांड करत आहेत. चित्रपट उद्योगात काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी स्किन फिलर्सचा खुलासा हा एखाद्याचा मेकअप ओळखण्यासारखे नव्हते. तो त्याच्या कामाचा अनिवार्य घटक होता. तरीही भारतातील ट्रोलर्सने राजकुमार राव याच्यावर भडिमार केला आणि ही कृती अयोग्यच म्हणावी लागेल. अर्थात ट्रोलर्सला उत्तर देताना त्याच्या समर्थकांनी देखील राव केवळ एका पात्रासाठी स्किन फिलर्स करत नाहीत तर ते काहीही करण्यास तयार असतात, असे सांगितले. ते आकर्षक दिसताना कोणतीही गोष्ट लपवत नाहीत, असेही स्पष्ट केले.

त्वचेवरचे खड्डे भरण्यासाठी किंवा सुरकुत्या कमी करण्यासाठी स्किन फिलर्सचा वापर करता येतो. याचप्रमाणे चेहर्‍यावरचे खड्डे हायल्युरोनिक किंवा हायालूरोनिक इंजेक्शनने देखील दूर करता येणे शक्य आहे. वास्तविक हायलूरोनिक अ‍ॅसिड हे शरीरात नैसर्गिकरीत्या असते. परंतु चेहरा निस्तेज झाला असेल तर बाहेरून सप्लिमेंट देत त्यात ताजेपणा आणला जातो. स्किन फिलर्स हे साधारणपणे सहा ते 12 महिन्यांपर्यंत राहते. ज्यांना आपला चेहरा सतत आकर्षक ठेवायचा आहे, त्यांना नियमितपणे स्किन फिलर्स करावे लागते. एक दिवस करून काम भागत नाही. साधारणपणे मनोरंजन उद्योगात काम करणारे कलाकार त्याचा नेहमीच वापर करतात. परंतु त्याचे दुष्परिणामही आहेत. सतत कॉस्मेटिकचा वापर केल्याने वेगवेगळ्या पात्रांसाठी हवा असणारा तजेलदारपणा चेहर्‍यावर टिकतोच असे नाही. जे ट्रोलर्स स्किन फिलर्सची माहिती देऊनही राजकुमार रावला ट्रोल करत आहेत, त्यांना सत्य ठाऊक असेलच असे नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news