चंद्रपूर : वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या | पुढारी

चंद्रपूर : वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा तेलंगणा राज्यातील आसीफाबाद परिसरात वाघाची शिकार करून त्याची कातडी तेलंगणा सिमेवरील महाराष्ट्रातील पाटागुडा गावात तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ तस्करांना जिवती वनविभागाने (रविवार) मुसक्या आवळल्या. ही कारवाई गोपनिय माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. हे संशयीत ६ आरोपी तेलंगनामधील आहेत.

मिळालेल्‍या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील काही तस्करांनी वाघाची शिकार करून त्याची कातडी व अन्य अवयवांची तस्करी महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांमध्ये होणार असल्‍याची माहिती मिळाली होती. त्‍या माहितीच्या आधारे जिवती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला.

वनविभागाने आंतरराज्यीय तस्करांवर करडी नजर ठेवली होती. तेलंगणामधील काही तस्कर वाघाची कातडी सिमेलगतच्या महाराष्ट्रातील पाटागुडा गावात घेऊन येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यामुळे सकाळपासून तस्करांच्या शोधावर वनविभागाचे अधिकारी चातकाप्रमाणे नजर ठेवून होते. सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या सिमेवरील जिवती तालुक्यातील पाटागुडा गावात सापळा रचण्यात आला. त्यानंतर आंतरराज्यीय सहा आरोपी पाटागुडा गावात कातडी विकण्याच्या उदेश्याने पोहचल्यानंतर त्यांच्या संशयीत हालचालीमुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडे पट्टेदार वाघाची कातडी आढळून आली. हे सहाजी तस्कर तेलंगणा राज्यातील आहेत. कातडी सापडताच जिवती वनविभागाने या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या तस्करांनी पट्टेदार वाघाची शिकार तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जवळच्या भागत केली केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर वाघाचे अवयव काढण्यात आले. त्यापैकी कातडी महाराष्ट्रातील जिवती तालुक्यातील पाटागुडा गावात विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिण्यांपासून तेलंगणामधील तस्कर या परिरात येऊन वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आंतरराज्यीय टोळीजा जेरबंद करण्याकरीता वनविभागाची नजर होती. अखेर (रविवार) वनविभागाने मोठी कारवाई केली आहे.

या गुन्ह्याचा तपास मुख्य वनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक मध्य चांदा श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे करीत आहेत. कारवाईत एस व्ही सावसागडे, अनंत राखुंडे, के बी कडकाडे, डी ए राऊत, वनरक्षक संतोष आलाम, संजय गरमाडे, प्रदीप मरापे, बालाजी बिंगेवाड या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश होता.

हेही वाचा : 

Back to top button