गोंदिया : जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून, दोघांना अटक | पुढारी

गोंदिया : जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून, दोघांना अटक

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शेती जमिनीच्‍या वादातून चार जणांनी  शेतकर्‍याचा खून केल्‍याची घटना सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी शेंडा येथे घडली. हिरालाल मेश्राम (वय ५४) असे खून झालेल्‍या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी ताराचंद पुस्तोडे व विनोद पुस्तोडे यांना देवरी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, हिरालाल मेश्राम हे मुलगा पवन मेश्राम व एका मजुरासह शेताला लागून असलेल्या शेतातून आलेली पाण्याची फुटलेली लाइन जोडण्याकरिता गेले होते. याचवेळी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेतमालक ताराचंद पुस्तोडे, त्याचा पुतण्या विनोद पुस्तोडे, रुपचंद पुस्तोडे व संदीप पुस्तोडे हे हिरालाल मेश्राम यांनी पाइपलाइनकरिता खोदलेल्या खड्ड्याजवळ गेले. हिरालाल मेश्राम हे पाइपलाइन दुरुस्त करीत असताना ताराचंद पुस्तोडे याने त्यांच्यावर फावड्याने हल्ला केला. यावेळी मुलगा पवन मेश्राम याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोक्‍याला दुखापत झाल्‍याने हिरालाल मेश्राम यांचा  मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करीत ताराचंद पुस्तोडे, विनोद पुस्तोडे याआरोपींना अटक केली. तपास पोलिस निरीक्षक डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button