सोलापूर तापले: पारा ४४ अंशावर; नागरिक घामाघूम | पुढारी

सोलापूर तापले: पारा ४४ अंशावर; नागरिक घामाघूम

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा: सोलापूर शहरात मागील तीन दिवसांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.३०) शहरातील तापमान या वर्षातील सर्वाधिक ४४ अंशावर पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरशा हैराण झाले असून अंगाची लाही लाही होत आहे. दुपारी एक ते चार वाजेपर्यंत शहरातील प्रमुख रस्ते सामसूम होत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून वेगवेगळे उपाय योजले जात आहेत.

एकीकडे सोलापूर जिल्ह्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यात सोलापुरातील उन्हाचा पारा वाढत चालला आहे. सकाळी ९ वाजल्यापासून उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. सोलापूरकर कामाला जाण्यासाठी सकाळी डोक्यावर टोपी, गॉगल, तोंडाला रूमाल बांधूनच घराबाहेर पडत आहेत.

दुपारी एक ते चार वाजेपर्यंत शहरातील प्रमुख रस्ते सामसूम पडत आहेत. वाढत्या उन्हामुळे, घामाने सोलापूरकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी आईस्क्रीम, ज्यूस, लिंब सरबत, उसाचा रस, नारळ पाणी यासह विविध थंड पेयाचा आधार नागरिक घेत आहेत. दुपारी उन्हाचे चटके बसत असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर फिरणे टाळले आहे. अंगावर चटके बसू लागल्यामुळे हैराण झालेले नागरिक उन्हात जड कामे करणे टाळत आहेत. एप्रिल महिन्यातच तापमान 44 अंशावर आले आहे. मे महिन्यात आणखी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.

बुधवार 24 एप्रिल – 41.2
गुरूवार 25 एप्रिल 41.2
शुक्रवार 26 एप्रिल -41.2
शनिवार 27 एप्रिल 42
रविवार 28 43.7
सोमवार 29 एप्रिल 42.9
मंगळवार 30 एप्रिल44 अंश

सोलापूरचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी विनाकारण उन्हात फिरू नये. गरज असल्यास तोंडाला रूमाल, गॉगल, डोक्यावर टोपी घालूनच बाहेर पडावे, त्रास जाणवत असेल. तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button