मोठी बातमी: पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर | पुढारी

मोठी बातमी: पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे, पुढारी ऑनलाईन: पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात 2012 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपी बंटी जहागीरदार उर्फ असलम शब्बीर शेखला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जहागीरदारला 2013 मध्ये अटक करण्यात आली होती.

त्याला 1 ऑक्टोबर 2015 रोजी हायकोर्टाने पहिल्यांदा जामीन मंजूर केला होता. मात्र, 2019 मध्ये जामिनाच्या अटींचं उल्लंघन केल्याबद्दल एटीएसच्या विनंतीवरुन बंटी जहागीरदारचा जामीन हायकोर्टाने रद्द केला होता. त्यानंतर जहागीरदारने 2020 मध्ये पुन्हा जामीनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. त्यानुसार त्याला आता परत जामीन मंजूर झाला आहे. एटीएसने पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे. मेमन, असद खान, मुनीब इक्बाल, इम्रान खान, सय्यद फिरोज, इरफान मुस्तफा लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी आणि असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार अशी त्यांची नावं होती. या आरोपींवर भारतीय दंड संहिता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, MCOCA स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यातील जंगली महाराज रोडवर 1 ऑगस्ट 2012 रोजी पाच साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बॉम्ब स्फोटामध्ये एक जण जखमी झाला होता. डेक्कन आणि जंगली महाराज रोड परिसरातील सहा ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. यातील पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले होते तर एक बॉम्ब फुटला नाही. हे बॉम्ब तयार करताना दहशतवाद्यांकडून काही त्रुटी रहिल्याने मोठी दुर्घटना टळली होती. यामुळे डेक्कन परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला या स्फोटांचं गांभीर्य लक्षात आलं नाही. मात्र, काही मिनिटांतच ठराविक अंतरावर ठेवण्यात आलेले पाच बॉम्ब सलग फुटल्याने मोठा हल्ला असल्याचं समोर आले. त्यानंतर पुण्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. त्यांनी स्फोट न झालेला बॉम्बही निकामी केला.

Back to top button