अकोला : सुपारी देवून पत्नीने काढला पतीचा काटा | पुढारी

अकोला : सुपारी देवून पत्नीने काढला पतीचा काटा

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अकोला पासून काही अंतरावर असलेल्या पुंडा येथे पत्नीने गावातीलच एका इसमास ३० हजार रुपये देवून पतीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या १२ तासाच्या आत दहीहांडा पोलिसांनी घटनेचा तपास लावण्यात यश मिळवले आहे.

याबाबत सविस्तर असे की, दहीहांडा पोलिस स्टेशनअंतर्गत पुंडा येथील कंचनचा विवाह पातूर तालुक्यातील पास्टूल येथील सचिन बांगर याच्याशी झाला होता. मात्र पती सचिन बांगर हा कंचनला त्रास देत होता. त्यामुळे पतीचा काटा काढायचे ठरवल्यानंतर कंचनच्या मनात आल्यानंतर कंचनने गावातील दिगंबर मालवे यास तीस हजार रुपये देवून पतीचा काटा काढण्याची सुपारी दिली. २८ डिसेंबर रोजी सचिन बांगर हा पुंडा येथे आला. त्याचा घरात गळा आवळून आधी खून केल्यानंतर मृतदेह गावातीलच एका ठिकाणी व्यायाम करण्याच्या लोखंडी अँगलला लटकवून ठेवला व आत्महत्या असल्याचे भासवले.

मात्र, दहीहांडा पोलिसांनी अधिक तपास करून घटनेचा उलगडा केला. याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी आरोपी पत्नी कंचन बांगर हिच्यासह दिगंबर मालवे यास अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांच्या मार्गदर्शनात पो.नि. सुरेंद्र राऊत, अरूण मुंढे, महिला पी.एस.आई शिल्पा धुर्वे, अरूण घोरमोडे, अनिल भांडे, निलेश गावंडे, रामेश्वर भगत, प्रफुल्ल डिडोंकार, मनीष वाकोडे, निलेश देशमुख, भारती ठाकुर यांनी केली.

हेही वाचा;

Back to top button