अमरावती : वाहतूक पोलिसांशी झटापट करणाऱ्यास २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा | पुढारी

अमरावती : वाहतूक पोलिसांशी झटापट करणाऱ्यास २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांशी झटापट करणाऱ्या एका आरोपीला न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. शेख समीर शेख बब्बू, ( वय 30, रा. कसाबपूरा, वलगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा निर्णय जिल्हा न्यायाधीश राजेंद्र व्ही. ताम्हाणेकर यांनी आज (दि.21) दिला. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधी चौकात 19 डिसेंबर 2014 रोजी सायंकाळी 5.25 च्या दरम्यान घडली होती.

लायसन्सबाबत विचारले असता झटापट करत जीवे मारण्‍याची धमकी

शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार मधुकर पांडुजी गवई 19 डिसेंबर 2014 रोजी गांधी चौकात वाहतूक नियंत्रण डयुटीवर होते. दरम्यान त्यांना सायंकाळी दुचाकीवरून तीन व्यक्ती बसून येताना आढळल्या. त्यांनी दुचाकी थांबवून नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख समीर शेख बब्बू असे सांगितले. त्यानंतर गवई यांनी संबंधिताला लायसन्सची मागणी केली. त्‍याने  कागदपत्रे न दाखविता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हवालदार गवईयांनी   शेख समीरला पकडले. यावेळी शेख याने गवई यांच्याशी झटापट केली. त्यांना खाली पाडून जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत गवई यांच्या उजव्या गुडघ्याला मार लागला.

याप्रकरणी गवई सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपासाअंती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनील जामनेकर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर अतिरिक्त सरकारी वकील पंकज रामेश्वर इंगळे यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र व्ही. ताम्हाणेकर यांनी आरोपीला दोषी ठरवत कलम 353 नुसार 2 वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास 2 महिने अतिरीक्त कारावास तसेच कलम 332 नुसार 1 वर्ष सश्रम कारावास व दोनशे रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त कारावास व कलम 128 मोटार वाहतूक कायद्यानुसार पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास 7 दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील पंकज रामेश्वर इंगळे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार बाबाराव मेश्राम व एनपीसी अरुण एम. हटवार तसेच कोर्ट मोहरर, विजय आडे यांनी पोलीस विभागाकडून कामकाज पाहिले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button