परभणी : २१ वर्षीय तरुण गावच्या सरपंच पदावर विराजमान | पुढारी

परभणी : २१ वर्षीय तरुण गावच्या सरपंच पदावर विराजमान

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षीच तरुण गावच्या सरपंच पदावर विराजमान झाला. दोन दशके निवडणुकीचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा पराभव करून, गावकऱ्यांनी उच्चशिक्षित तरुणाच्या हाती गाव कारभाराची धुरा सोपवली आहे. दीपक वसंत चव्हाण असे २१ वर्षीय नुतन सरपंचाचे नाव आहे. जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी मंगळवारी (दि.२०) तो विजयी झाला.

दीपक चव्हाण या महत्वकांक्षी तरुणाने समाजसेवा करण्याचे ठरवले. सरपंच पदाची सूत्र सोपवण्यासाठी गावकऱ्यांनी हाक दिली. तेव्हा त्यांनी विचार करत बसण्यापेक्षा गावच्या विकासाला प्रधान्य दिले. गावाचा नावलौकिक वाढवणाऱ्या दीपक चव्हाण ने आता समाजकारणासोबतच राजकारणात उडी घेतली आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत दीपक वसंत चव्हाण यांना ५२७ मते मिळाली. जिंतूर तालुक्यातिल सोनापूर तांडा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंगळवारी तो विजयी झाला. निकाल जाहीर होताच जल्लोष करण्यात आला.

घरातून कुठल्याही प्रकारे राजकीय वारसा नसलेल्या दीपक चव्हाण यांनी शिक्षण घेत गावात गोरसेनेच्या माध्यमातून समाजकारण सुरू केले. गावातील गोरगरीब लोकांची कामे करणे, अडीनडीला धावून जाणे, असा प्रवास चालू झाला. यामुळेच सोनापूर तांडा येथील नागरिकांनी त्याला भरघोस मतांनी विजयी करून वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी गावच्या सरपंचपदी विराजमान होण्याची संधी दिली. दीपक वसंत चव्हाण हा परभणी जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच ठरला आहे. त्याच्या विजयाने गावात आनंदाचे वातावरण असून उच्च शिक्षित तरुणाचा ग्रामीण राजकारणातील प्रवेश आशादायी मानला जात आहे.

विकासासाठी प्रयत्न करणार

विजयानंतर प्रतिक्रिया देताना दीपक चव्हाण म्हणाला ‘ गावाच्या विकासाचा माझा अजेंडा होता. तो मतदारांनी स्वीकारला आहे. आता जबाबदारी वाढली असून, गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे’.

हेही वाचलंत का?

Back to top button