खोक्याची भाषा अजित पवारांच्या तोंडी शोभत नाही : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

खोक्याची भाषा अजित पवारांच्या तोंडी शोभत नाही : मुख्यमंत्री शिंदे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या तोंडी खोक्याची भाषा शोभत नाही. खोक्यांचा ढीग लावला तर शिखर इतके उंच होईल की तेथून कडेलोट होईल, असा इशारा देतानाच आम्हाला राज्याचा लवासा करायचा नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला सुनावले. २०१९ मध्ये स्थापन केलेले सरकार पूर्णपणे अनैतिक होते, याचा पुनरुच्चार करत सोयरिक एकाशी केली, संसार दुसऱ्याशी थाटला, हे जनतेला माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

दुसरीकडे अजित पवार यांनी खोके सरकार म्हणणे शोभत नाही, उद्या त्यांचाच कडेलोट होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी विरोधकांची पत्रकार परिषद झाली होती. विरोधकांच्या मुद्दयांनाही शिंदे, फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

अजित पवार- उद्धव ठाकरेंकडूनच विदर्भावर अन्याय : फडणवीस

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी सहा महिन्यांत सरकारने काय केले, असा सवाल उपस्थित करत ‘खोके सरकार, स्थगिती सरकार’ अशी खिल्ली उडवली होती, याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तरे दिली. लोकायुक्त कायद्यासारखे मोठमोठे निर्णय राज्य सरकार घेत आहे. प्राधान्य क्रमवारीनुसार विकासकामांवरील स्थगितीही उठवलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भाचा अनुशेष कोणी वाढवला, याचे आकडेच अधिवेशनात मांडले जातील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

अधिवेशन चार आठवडे चालवण्याची तयारी

विदर्भ, मराठवाड्यावर चर्चा होण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन उपयुक्त ठरावे ही आमचीही इच्छा आहे. तीन आठवड्याचेच काय, आम्ही चार आठवडे अधिवेशन चालवण्याची आमची तयारी आहे. त्यांनी एक आठवड्याचेही अधिवेशन गेल्यावेळी घेतले नाही. त्यामुळे त्यांनी ही मागणी करावी हे हास्यास्पद आहे, असे फडणवीस म्हणाले.

सीमाप्रश्नावर हीन दर्जाचे राजकारण

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज यांना रा मागणारे आज एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. वारकऱ्यांचा अपमान करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे माहीत नाही अशा मंडळींना महापुरुषांच्या अपमानाविषयी बोलण्याचा अधिकारच नाही. मुळात हे सगळं केवळ राजकारण सुरू आहे आणि त्यांना जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. सीमाप्रश्नावरही २०१३ मध्ये काही गावच्या मंडळीनी कर्नाटकमध्ये जाण्याची तयारी दाखविली होती, असा संदर्भ देत योग्य वेळी योग्य माहिती आम्ही पुढे आणू. काही नेते, काही पक्षांचे पदाधिकारी हीन दर्जाचे राजकारण या प्रश्नावर करीत आहेत. ही मंडळी कोण, त्यांची नावे आम्ही योग्य वेळी अजित पवारांनाही देऊ, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

Back to top button