सॅम पित्रोदांच्या वक्तव्याविरोधात दिल्लीत भाजपची निदर्शने | पुढारी

सॅम पित्रोदांच्या वक्तव्याविरोधात दिल्लीत भाजपची निदर्शने

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : इंडीयन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याविरोधात दिल्ली भाजपने गुरुवारी (९ मे) जोरदार निदर्शने केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी नारेबाजीही करण्यात आली. निदर्शनावेळी दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा, खासदार रमेश बिधुडींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, काही वेळाने दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

सॅम पित्रोदा यांनी भारतीयांच्या विविधतेबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा संपूर्ण देशात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी पित्रोदांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. दिल्लीत भाजपने पित्रोदांच्या या वक्तव्याविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा, खासदार रमेश बिधुडी यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि पित्रोदांविरोधात नारेबाजी केली. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदांनी देशाची माफी मागावी, असे फलकही या निदर्शनादरम्यान झळकले.

सॅम पित्रोदांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करताना दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, ‘काँग्रेसने या देशाचे विभाजन करण्याचे षडयंत्र रचले आहे. भारताची ताकद ही सांस्कृतिक विविधता, एकता आणि अखंडता आहे. त्यावर वर्णद्वेषी टीका करून, काँग्रेसने संपूर्ण देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे..राहुल गांधींनी माफी मागावी अशी आमची मागणी आहे, त्यांनी सर्व भारतीयांचा अपमान केला आहे.’

Back to top button