बुलढाणा: साखळी मार्केटिंगद्वारे २५ लाखांचा गंडा घालणारे दोन भामटे जेरबंद | पुढारी

बुलढाणा: साखळी मार्केटिंगद्वारे २५ लाखांचा गंडा घालणारे दोन भामटे जेरबंद

बुलढाणा : पुढारी वृत्तसेवा : साखळी मार्केटिंगद्वारे जिल्ह्यातील १५० जणांना २५ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोघा सराईत भामट्यांना बुलढाणा पोलिसांनी नाशिक येथून बेड्या ठोकल्या. संजय दुसाने (रा. ठाणे) व मनोज पवार (रा. नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही सराईत भामटे असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात दिशा साखळी मार्केटिंगच्या माध्यमातून दुसाने व पवार या जोडीने ठाणे व नाशिक परिसरातील हजारो लोकांना २ कोटी ३५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी नवघर व अंबड (नाशिक) पोलिसांनी अटक केली होती. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर दोघांनीही बुलढाणा जिल्ह्यात त्यांचे कारनामे सुरूच ठेवले होते.

प्रत्येकी ८ हजार ५०० रूपयांमध्ये दिशा मार्केटिंग साखळी योजनेचे सदस्यत्व देत त्यांनी जिल्ह्यातील १५० लोकांना लाभाची विविध प्रलोभने दाखवली. आणि २५ लाखांचा गंडा घातला होता. दरम्यान, फसवणूक झालेल्या लोकांच्या तक्रारीवरून २०१९ मध्ये संजय दुसाने व मनोज पवार या दोघांवर बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून दोघेही फरार होते. तपासादरम्यान नुकतेच पोलिसांना त्यांच्या सुगाव्याचे धागेदोरे हाती लागले होते. एपीआय जयसिंग पाटील यांच्या पथकाने नाशिक येथून दोघांना अटक केली.

हेही वाचा : 

Back to top button