तिघांचा बळी घेणारा भानुसखिंडीचा बछडा अखेर जेरबंद! | पुढारी

तिघांचा बळी घेणारा भानुसखिंडीचा बछडा अखेर जेरबंद!

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ताडोबाच्या बफर क्षेत्रातील निमढेला उपक्षेत्रातील जंगलालगत धुमाकूळ घालून तिघांचा बळी घेणारा  भानुसखिंडीचा बछडा आज शनिवारी वन विभागाने जेरबंद केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ताडोबाच्या बफर क्षेत्रातील निमढेला उपक्षेत्रातील गावांमध्ये भानुसखींडी वाघिनीच्या बछड्याने जंगला परिसर व गावामध्ये तिघांचा जीव घेतला. त्यामधे सुर्यभान कटू हजारे (रा. बेंबळा), रामभाऊ रामचंद्र हनवते (रा. निमढेला), अंकुश श्रावण खोब्रागडे (रा. खानगाव) यांचा समावेश आहे.

बुधवारी (दि.15) चिमूर तालुक्यातील खानगाव शेतशिवारात स्वत:च्या शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्लाकरून ठार केल्याची घटना ताजी असताना वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप उफाळला.

अंकुश श्रावण खोब्रागडे (वय 33 वर्ष) या युवा शेतकऱ्याला मात्र जीव गमवावा लागला. त्यामुळे वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली. अखेर भानुस खिंडीच्या बछड्याला  पकडण्याकरीता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर,  ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) दिपेश मल्होत्रा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) चे उप संचालक कुशाग्र पाठक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सहा वनसरंक्षक वाठोरे यांच्या मार्गदर्शनात  रेस्कु ऑपरेशन करण्यात आले.

आज सकाळी (दि.18) अकरा वाजता दि. 18/05/2024 रोजी सकाळी 11.00 वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र (बफर) खडसंगी परिक्षेत्रातील नियतक्षेत्र निमढेला मधील कक्ष क्रमांक 59 मध्ये भानुसखींडी वाघीनीचा बछड्याला रेस्कू करुन पकडण्यात आले. या रेस्कु ऑपरेशनमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) देवुळकर,वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, यांच्यासोबत  पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प डॉ. आर. एस. खोब्रागडे,  आर. आर. टी. प्रमुख  ए. सी. मराठे, पोलीस नाईक (शुटर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आदिंसह अनेक अधिकारी उपस्थीत होते. शूटर यांनी डार्ट मारून बेशुद्ध केले. सदर वाघाची प्रकृती बरी असुन त्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्र, नागपुर येथे हलविण्यात आले आहे.

Back to top button