Uday Samant : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे कारस्थान : उदय सामंत | पुढारी

Uday Samant : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे कारस्थान : उदय सामंत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने आज (दि.१७) काढण्यात आलेल्या महामोर्चावर उद्योग मंत्री उदय सामंत  (Uday Samant) यांनी निशाणा साधला. विक्रमी मोर्चा होईल, असे वातावरण तयार करण्यात आले. मात्र, असे काहीही झाले नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप मंत्री सामंत यांनी यावेळी केला.

(Uday Samant) महापुरूषांचा भाजप नेत्यांकडून केला जाणारा अवमान, राज्यपालांचे छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (दि. १७) मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने माफी मांगो आंदोलन करण्यात आले. तर शिंदे गटाकडून महाविकास आघाडीच्या मोर्चावर टीका करण्यात आली.

मंत्री सामंत म्हणाले की, महाविकास आघाडीकडून विक्रमी मोर्चा होईल, असे वातावरण तयार करण्यात आले. मात्र, असे काहीही झाले नाही. या मोर्चात राष्ट्रवादीची लोकच जास्त होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. मंहाविकास आघाडीतील नेत्यांकडून देवदेवतांचा अपमान केला जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरून वादग्रस्त विधान केली जात आहे. तर दुसरीकडे सरकारला बदनाम केले जात आहे; परंतु याकडे आम्ही लक्ष देणार नाही, कारण आम्ही महाराष्ट्राला विकासाचे देणे लागतो, असेही सामंत म्हणाले.

दरम्यान, सावरकरांचा अपमान केला गेला, तेव्हा मोर्चा का काढला नाही?, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शिवसेना पक्षप्रमुख( ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्चावर बोलताना फडणवीस म्‍हणाले, “उद्धव ठाकरे यांनी आजच्‍या आपल्‍या भाषणात नेहमीचीच कॅसेट वाजवली. त्यानी कॅसेट पुढे न्यावी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या नाही, तो गेल्या ६० वर्षांपासून सुरु आहे.”

हेही वाचलंत का ? 

Back to top button