कर्नाटक निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचेही तुकडे करेल : उद्धव ठाकरे | पुढारी

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचेही तुकडे करेल : उद्धव ठाकरे

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातील गावांवर हक्क सांगत आहेत. पुढील वर्षी कर्नाटकची निवडणूक होणार आहे, त्यासाठी भाजप महाराष्ट्राचे तुकडे करायलाही मागे-पुढे पाहणार नाही, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपवर कडाडून हल्ला चढवला.

दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी आपण पुढील सभा बुलडाण्यात घेणार असल्याचे सांगितले होते. त्याचा उल्लेख करीत ठाकरे यांनी भाषण सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, प्रकल्पांची पळवापळवी आणि सीमा प्रश्न यावर बोलताना त्यांनी भाजपला जबाबदार धरले. ते म्हणाले की, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांचा वारंवार अवमान करायचा, असे सध्या सुरू आहे. शिंदे सरकारने राज्यपालांचा निषेध करण्याऐवजी त्यांची बॅग पॅक करून त्यांना पाठवून देण्याची हिंमत दाखवायला हवी होती. मी मुख्यमंत्री असताना, राज्यपालांचा अगाऊपणा सहन करत नव्हतो. राज्यपाल म्हणून मी त्यांचा मान राखू शकतो; पण तुमच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलेले आहे त्याचा मान राखू शकत नाही, तुम्ही महाराजांचा अवमान करत असाल; तर तुम्ही घरात बसा. आम्ही सहन करणार नाही. महाराज जुने आदर्श कसे होऊ शकतात? असा सवाल ठाकरे यांनी केला.

ठाकरे म्हणाले की, गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उद्योग तिकडे पाठवत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातील गावांवर हक्क सांगत आहेत. पुढील वर्षी कर्नाटकची निवडणूक होत आहे. त्यासाठी उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडेही करेल. शिंदे गप्प बसतील. महाराष्ट्राचे दैवत असलेला विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार. हे महाराष्ट्र मुळीच सहन करणार नाही.

 वीजबिल माफीबाबत मध्य प्रदेश पॅटर्न राबवण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत नसताना केली होती. तो व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सत्तेत नसताना वेगळी भाषा आणि सत्तेत असताना वेगळी भाषा करता. आज मी सत्तेत नाही, मात्र तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. शेतकर्‍यांचे वीज बील माफ करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

 एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे यांनी जोरदार टीका केली. त्यांच्या गुवाहाटी दौैर्‍याचा उल्लेख करीत ठाकरे म्हणाले की, आज नवस फेडायला गेले आहेत काही दिवसांपूर्वी हात दाखवायला गेले होते. ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपले भवितव्य ठरवायला निघाले आहेत. तुमचे भविष्य ठरवणारे दिल्लीत बसले आहेत. त्यांनी उठ म्हटले की उठायचे आणि बस म्हटले की बसायाचे अशी स्थिती त्यांची आहे, असेही ठाकरे म्ह्णाले.

Back to top button