भंडारा : पवनीत अनैतिक संबंधातून शिक्षकाचा खून | पुढारी

भंडारा : पवनीत अनैतिक संबंधातून शिक्षकाचा खून

भंडारा: पुढारी ऑनलाईन डेस्क : अनैतिक संबंधातून शिक्षकाचा खून केल्याची घटना पवनी तालुक्यातील धानोरी येथील जंगलात उघडकीस आली. याप्रकरणी ४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
धनंजय आत्माराम कुंभलकर (वय ५६, रा. रामपुरी वॉर्ड, पवनी) असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. तर अजित राजू बक्सरे, योगेश राजकुमार मठिया, शंकर साठवणे, राजू मनोहर उपरीकर (सर्व रा. पवनी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय कुंभलकर यांच्या पत्नीचे आरोपी राजू उपरीकर याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय कुंभलकर यांना होता. त्यामुळे धनंजय कुंभलकर यांनी राजू उपरीकर याच्या खुनाची सुपारी दिली होती. परंतु, राजू उपरीकर हा योगेश मठिया याचा मित्र असल्याने राजू उपरीकरच्या सांगण्यावरुन आरोपींनी धनंजय कुंभलकर यांची धानोरी येथील जंगलात नेऊन हत्या केली.

दरम्यान, अजित बक्सरे या आरोपीने कुंभलकर यांची दुचाकी विक्रीसाठी पवनीत आणली होती. दुचाकी विक्रीची माहिती पवनी पोलिसांना कळताच त्यांनी अजितला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने योगेश मठिया व शंकर साठवणे यांच्यासोबत धनंजय कुंभलकर यांची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी अजित बस्करे, योगेश मठिया, शंकर साठवणे आणि राजू उपरीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील शंकर साठवणे हा आरोपी फरार असून अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

धनंजय कुंभलकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गढरी करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button