नवी मुंबई : वाहतूक पोलिसाला कार चालकाने २ किमीपर्यंत नेले फरफटत | पुढारी

नवी मुंबई : वाहतूक पोलिसाला कार चालकाने २ किमीपर्यंत नेले फरफटत

नवी मुंबई : पुढारी वृतसेवा : कोपरा उड्डाणपूल येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दुभाजकाचे काम सुरू आहे. याठिकाणी वाहतुकीला बंदी असताना विरूध्द दिशेने येणाऱ्या कार चालकाला वाहतूक पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कार वाहतूक पोलिसाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस कर्मचाऱ्याने जीव वाचवण्यासाठी बोनेटवर उडी घेतली. यावेळी कार चालकाने दोन किमीपर्यंत पोलिसाला फरफटत नेल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार चालकाचे नाव आकाश कुमार महेशकुमार जांगीड असे आहे. शनिवार दुपारी एकच्या सुमारास कोपरा पुलावर नामदेव गादेकर हे कर्तव्यावर होते. कोपरागावाकडून विरूध्द दिशेने येणारे वाहन चालक आकाश कुमार महेशकुमार जांगीड याला (कार नंबर MH 46BZ6296) अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने कार न थांबवता गादेकर यांच्या अंगावर घातली. यावेळी त्यांनी जीव वाचविण्यासाठी गाडीचा बोनेट पकडण्याचा प्रयत्न केला. वाहन चालकाने त्यांना कोपरा ब्रिज ते खारघर सेक्टर पंधरा डीमार्ट समोरील स्वर्णा गंगा ज्वेलरी शॉप खारघर या ठिकाणापर्यंत गाडीच्या बोनेटवर फरफटत नेले.

गादेकर यास फरफटत नेत असल्याचे पोलिस कर्मचारी यांच्या निदर्शनास आले. त्याने एका वाहन चालकाची मदत घेवून गाडीचा पाठलाग करून आरोपी अडवून गादेकर यांची सुटका केली. हा प्रकार डॉ. जानवी पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. याविषयी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघर वसाहतीतून बाहेर पडताना कोपरा भुयारी मार्गालगत होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खारघर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी २१ जून पासून वाहनास बंदीचे आदेश दिले होते. नागरिकांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी, यासाठी कोपरा पुलावर दुभाजक उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात केले आहेत.

Back to top button