Sanjay Raut : बंडखोरांची दहा दिवसात दहा कारणं…,खरं कारण मी सांगतो | पुढारी

Sanjay Raut : बंडखोरांची दहा दिवसात दहा कारणं...,खरं कारण मी सांगतो

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

संजय राऊत हे नाशिक दौ-यावर आहेत. शिवसेनेतील बंडानंतर पक्षबांधणीसाठी संजय राऊत नाशिकमध्ये आले आहेत. त्यांनी आज शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाणा साधला. बंडखोरांना शिवसेनेची बदनामी करणे पचणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

बंडखोर बंडखोरीची दरवेळी वेगवेगळी कारणं देतात. त्यांनी दहा दिवसांची दहा वेगवेगळी कारणं दिली.  जेव्हा गेले तेव्हा पहिला दिवस, शिवसेनेने म्हणे हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही बाहेर पडलो. दुसरा दिवस राष्ट्रवादीचे लोक आम्हाला निधी देत नव्हते म्हणून आम्ही बाहेर पडलो. मग तिसरा दिवस आम्हाला उद्धव ठाकरे भेटीला वेळ देत नव्हते म्हणून आम्ही बाहेर पडलो. चौथ्या दिवशी आदित्य ठाकरे जास्त ढवळाढवळ करतात म्हणून आम्ही बाहेर पडलो. पाचवा दिवस – विठ्ठला भोवती बडवे जास्त झाले आहेत म्हणून आम्ही सगळे भडवे बाहेर पडलो. सहावा दिवस संजय राऊत यांच्यामुळे बाहेर पडलो. सातव्या दिवशी शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे म्हणून आम्ही बाहेर पडलो. मी म्हणालो, असा मानसिक गोंधळ करु नका,  बाहेर का पडलो याचे नेमके कारण ठरवा. बंडखोरांचं दहावं कारण सांगताना संजय राऊत म्हणाले, बंडखोरांच्या गटात चिमणराव आबा पाटील नावाचे आमदार आहेत. त्यांनी आपण गुलाबराव पाटील यांना कंटाळून बाहेर पडलो असल्याची खदखद बोलून दाखवल्याचे संजय राऊत म्हणाले. गुलाबराव पाटलांनी जळगावात शिवसेना वाढू दिली नाही, शिवसैनिकांना त्रास दिला, त्याला कंटाळून मी शिवसेना सोडतोय असे कारण चिमणरावांनी दिल्याचे संजय राऊत म्हणाले. हिंदुत्वामुळे शिवसेना सोडली किंवा उद्धव ठाकरेंमुळे सोडली ही कारणे बकवास आहेत, खरी कारणे समोर येत आहेत असे संजय राऊत यावेळी म्हणाले.  शिवसेना सोडल्याचे मुख्य कारण खोकेबाजी आहे. आता त्या खोकेबाजीला ठोकेबाजीने उत्तर देऊ असे संजय राऊत म्हणाले. गुलाबराव पाटलाचा जुलाबराव होईल, 50 खोकी पचणार नाहीत अशी बोचरी टीका त्यांनी गुलाबराव पाटलांवर केली.

राऊत म्हणाले, शिवसेनेच्या स्थापनेपासून या देशात 280 सेना निर्माण झाल्या. पण उरल्या फक्त दोनच सेना एक भारतीय सेना व दुसरी शिवसेना. एक भारतीय सेना जी देशाचे रक्षण करते, आणि दुसरी शिवसेना जी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं रक्षण करते. या सेनेचे सेनापती हिंदुह्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि हे जे सैन्य आहे ते केवळ पोटावर चालत नाही तर निष्ठेवर चालते.

नाशिकचे चित्र प्रेरणा देणारे

नाशिकविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले,  नाशिकमधील चित्र हे प्रेरणा देणारे आहे. शिवसेनेला उर्जा देणारे हे स्थान आहे. नाशिकच्या शिवसेनेने महाराष्ट्राच्या शिवसेनेला उर्जा देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचे दरवाजे याच नाशकात उघडले आहे. नाशिक ही पवित्र भूमी आहे. विकत गेलेल्यांची ही भूमी होऊ शकत नाही. धनुष्यबाण आपल्या हातात ठेवा, तो कुठे घुसवायचा याचा आदेश आपल्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वेळ आल्यावर देतील. आजपासून जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button