वाशिम : मनसे कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषदेत राडा | पुढारी

वाशिम : मनसे कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषदेत राडा

वाशीम : पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाविरोधात घोषणाबाजी करत मनसे कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. याप्रकरणी मनसेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली बु. येथील रस्ता दुरूस्त करण्याची मागणी मनसे वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली होती. परंतु या मागणीची दखल न घेतल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी बांधकाम कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करून तोडफोड केली.

याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या वाशीम ते चिखली बु. या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती त्वरीत करण्याची मागणी मनसे जिल्हा वाहतूक शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे केली होती. दरम्यान, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ३१ मे रोजी सदर रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. निविदा प्रक्रियेनंतर लवकरच काम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मात्र, या संदर्भात काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करून कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकारामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात तासभर ठिय्या दिला. याप्रकरणी बांधकाम विभागाचे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी एस. आर. देशमुख यांच्या तक्रारीवरुन मनसे वाहतूक सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्यासह १० ते १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button