‘पीएम-किसान’साठी ई-केवायसीचे तीन लाख शेतकरी शिल्लक | पुढारी

‘पीएम-किसान’साठी ई-केवायसीचे तीन लाख शेतकरी शिल्लक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ सहज मिळावे, यासाठी ओळख पडताळणी (ई-केवायसी) बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील 43 टक्के पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. तर उर्वरित 57 टक्के शेतकरी शिल्लक आहेत. लाभार्थ्यांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे 3 हप्त्यात 6000 रुपये प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील चार लाख 97 हजार 937 लाभात्र्यांना सुमारे 711 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

मृगातील आठ फळपिकांना ‘विमा’; जाणून घ्या कोणत्या पिकांचा आहे समावेश

पंधरा रुपये शुल्क

पीएम किसान पोर्टलवरील लिंकद्वारे लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणार्‍या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई -केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सुविधा केंद्राकडून रक्कम 15 रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारले जाईल.

केंद्र शासनाने योजनेचा लाभ चुकीच्या व्यक्तीला मिळूनये यासाठी केवायीसी बंधनकारक केले आहे. जोपर्यंत केवायसी होणार नाही, तोपर्यंत हप्ता बँकखात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ केवासी करुन घ्यावे.
हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी

 

Back to top button