मृगातील आठ फळपिकांना ‘विमा’; जाणून घ्या कोणत्या पिकांचा आहे समावेश | पुढारी

मृगातील आठ फळपिकांना ‘विमा’; जाणून घ्या कोणत्या पिकांचा आहे समावेश

पुणे: पुढारी वृत्तसेवा

राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येत आहे. संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या आठ पिकांचा त्यात समावेश आहे. ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार आणि उत्पादनक्षम फळबागांनाच लागू राहणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, सापेक्ष आर्द्रता, किमान तापमान या हवामान धोक्यांपासून या योजनेंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. ही योजना फळ पिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा न होण्याबाबत घोषणापत्र हे ज्या बँकेमध्ये पीककर्ज खाते, किसान क्रेडिट कार्ड खाते आहे, तिथे जमा करणे आवश्यक आहे.

पुणे : बारामती तालुक्यात शेतीपंप चोरणारी टोळी गजाआड

पुणे जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड शासनाने निश्चित केली आहे. या योजनेत नमूद केलेल्या फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

शेतकर्‍यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्क्यांच्या मर्यादेत असतो. फळपीकनिहाय पुणे जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे. (शेतकर्‍यांनी भरावयाचा प्रतिहेक्टरी विमा हप्ता). संत्रा 80 हजार (4 हजार रुपये), मोसंबी 80 हजार (4 हजार), पेरू 60 हजार (3 हजार), चिकू 60 हजार (3 हजार), लिंबू 70 हजार (3 हजार 500 रुपये ), डाळिंब 1 लाख 30 (6 हजार 500), सीताफळ 55 हजार (2 हजार 750 रुपये ), द्राक्षे 3 लाख 20 हजार (16 हजार ). वास्तवदर्शी विमा हप्ता 35 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर 35 टक्क्यांपेक्षा जास्त असणार्‍या विमा हप्त्याचा 50 टक्के भार शेतकर्‍यांना द्यावा लागेल, अशी माहिती कृषी आयुक्तालयातील विनयकुमार आवटे यांनी दिली.

Back to top button