Solapur : पोटच्या मुलीवर इतके वाईट अत्याचार! ही क्रूरता करणाऱ्या पती-पत्नीस मरेपर्यंत फाशी | पुढारी

Solapur : पोटच्या मुलीवर इतके वाईट अत्याचार! ही क्रूरता करणाऱ्या पती-पत्नीस मरेपर्यंत फाशी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : स्वत:च्या मुलीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु. एल. जोशी यांनी पती-पत्नीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या नराधमाने 16 महिन्याच्या मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. (Solapur)

धोलाराम अर्जुनराम बिष्णोई (वय 26) आणि पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई (वय 20, दोघे रा. रामपल्ली, आर. एल. नगर, हैदराबाद) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. मयत सोळा महिन्याच्या निर्भयावर आरोपी धोलाराम याने दारू पाजून तिच्यावर नैसर्गिक, अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार केला. 3 जानेवारी 2022 रोजी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घटली.

वेदनेमुळे पिडीत निर्भया रडत असताना त्यांनी तिचा आवाज बंद करण्याचा क्रूर प्रयत्न केला. ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून केला. तसेच पुनीकुमारी हिने हे कृत्य करण्यास आरोपीस मदत केली.

या घटनेची माहिती कोणासही न देता निर्भयाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात आली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत सिकंदराबादहुन राजस्थान येथे नेण्याचा प्रयत्न केला. राजकोट एक्सप्रेस मध्ये बसून घेऊन जात असताना सोलापूरच्या रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली.

तसेच निर्भयाच्या मृतदेहाची तपासणी शासकीय रुग्णालयात करण्यात आली. सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.

या खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी पक्षाकडून 31 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी, डीएनए अहवाल, रासायनिक विश्लेषणाचा अहवाल या बाबींसह सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश जोशी यांनी आरोपींना मरेपर्यंत फाशी तसेच विविध कलमांद्वारे पाच हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारच्या वतीने एडवोकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिले.

हेही वाचा

Back to top button