चंद्रपूर : बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड डेपोला आग | पुढारी

चंद्रपूर : बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड डेपोला आग

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरापासून जवळच असलेल्या आष्टी – चंद्रपूर मार्गावरील बल्लारपूर पेपर मिलच्या निलगिरी, बांबू व सुभाबुळ लाकूड डेपोला रविवारी (22 मे) दुपारच्या सुमारास भिषण आग लागून संपुर्ण डेपोच जळून खाक झाला. निलगिरी व सुभाबुळ जळून करोडोंचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. लाकूड डेपोला लागलेली आग इतरत्र पसरल्याने लागूनच असलेल्या कळमना येथील पेट्रोलपंपही आगीच्या विळख्यात सापडला आहे. अग्निशामक दलाकडून दुपारपासून आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

आष्टी-चंद्रपूर मार्गावरील कळमना पेट्रोलपंप लगत बल्लारपूर पेपर मिलचे लाकूड साठवण डेपो आहे. बल्लारपूर पेपर मिलला कागद निर्मितीसाठी लागणारा लगदा तयार करण्यासाठी निलगिरी-सुभाबुळ-बांबू असा कच्चामाल या डेपोमध्ये उघड्यावर साठविला जातो. आज रविवारी (22 मे ) दुपारच्या सुमारास लाकूड डेपोला अचानक भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाहता पाहता संपूर्ण लाकूड डेपो आगीच्या विळख्यात सापडला. अगदी महामार्गाला लागून असलेल्या लाकूड डेपोला लागलेल्या आगीच्या ज्वाला किलोमीटरवरून दिसत आहेत. डेपोमध्ये ठेवलेले निलगिरी, बांबू व सुभाबूळचे लाकडे आगीच्या विळख्यात सापडल्याने करोडोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आग विझविण्यासाठी बल्लारपूर नगरपरिषद, चंद्रपुर महानगरपालिका व बल्लारपूर पेपर मिलच्या अग्निशमन दलाच्या वाहनांना बोलाविण्यात आले. दुपारपासून तर सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आण्यासाठी अग्निशामक दलाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र आग आटोक्यात आलेली नव्हती. विशेष म्हणजे या डेपोपासून जवळच कळमनाजवळ साची नावाचे पेट्रोलपंप आहे. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आगीने पेट्रोपपंही आगीच्या विळख्यात घेतले आहे. पेट्रोलपंपाला आग लागताच एकच खळबळ उडाली. पेट्रोलपंपावर आगीमुळे स्फोट झाला. आग इतकी भयंकर होती की, बल्लारपूर कोठारी मार्गावर आगीच्या ज्वालांचे लोळ उडत होते. त्यामुळे संपूर्ण परिसर आगीच्या धूराने झाकले गेले. आगीची भिषणता पाहता या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आलेली आहे.

हेही वाचा

Back to top button