पुणे : व्हिडीओ व्हायरलची धमकी देत मैत्रिणीच्या पतीनेच बलात्कार करून उकळली खंडणी | पुढारी

पुणे : व्हिडीओ व्हायरलची धमकी देत मैत्रिणीच्या पतीनेच बलात्कार करून उकळली खंडणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीवर बलात्कार करून खंडणी उकळल्याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय २२) आणि आशिष विजय कांबळे (वय २३, दोघे रा. थिटे वस्ती, खराडी) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत.

याप्रकरणी २३ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी परिसरातील डब्ल्युटीसी सेंटर, वाघोलीतील खांदवेनगरमधील कृष्णा लॉज येथे जून २०२१ ते २० मे २०२२ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी सिद्धार्थ हा फिर्यादीच्या मैत्रिणीचा पती आहे. त्याने फिर्यादीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मेसेज केला. त्यानंतर फिर्यादीला फोन करुन तू मला खूप आवडतेस, असे म्हणून तिला कारने वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी फिर्यादीचे अश्‍लील फोटो व व्हिडीओ काढले. ते फोटो व व्हिडिओ व्हायरल करेल व तुझ्या घरच्यांना दाखवतो, अशी धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी १७ हजार रुपये उकळले.

सिद्धार्थचा मित्र आशिष कांबळे यानेही फिर्यादी यांना धमकी देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. तिला  मारहाण करुन पैशांची मागणी केली. त्यामुळे सतत होणारा अत्याचार आणि पैशांची मागणी याला कंटाळून शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ?  

Back to top button