अकोला जगात सर्वात उष्ण; सलग तिस-या दिवशी तापमान ४४ अंशांवर | पुढारी

अकोला जगात सर्वात उष्ण; सलग तिस-या दिवशी तापमान ४४ अंशांवर

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अकोला जिल्हयाच्या तापमानात सोमवारच्या तुलनेत एका अंशाने आणखी भर पडली असून मंगळवारी 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजचे अकोल्याचे तापमान सर्वाधिक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

शहरासह ग्रामीण भागात उन्हाचा सततचा तडाखा नागरिकांना असह्य होत आहे. सूर्योदयानंतर या भागात तापमानाची तीव्रता जाणवू लागते आहे. दुपारी 12 वाजल्यानंतर तर सूर्याची प्रखरता अधिकच वाढते. गेल्या काही दिवसांपासून 43 अंशाच्या आसपास राहिलेले तापमान आता 44 अंशाच्या घरात पोहोचले आहे. तीन दिवसांपासून अकोला विदर्भात तापमान टॉपवर आहे. जनजीवनावर वाढत्या तापमानाचा परिणाम दिसत आहे.

अकोला

यंदाचा उन्हाळा चांगलाच ग्रासतो आहे. मार्च महिन्यातील तापमानाने तर यंदा उच्चांक गाठला. आता एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानवाढ सुरुच आहे. उन्हाच्या झळा सुसह्य व्हाव्यात यासाठी नागरिक विविध उपाय योजना करीत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या माहिती नुसार शुक्रवार (दि. 8) पर्यंत जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो बाहेर जाणे टाळावे.

अशा तापमानामध्ये नागरिकांनी शारीरिक श्रमाची कामे टाळावीत अशक्तपणा, डोकदुखी, चक्कर येणे ही उष्माघात होण्याची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यानुसार याबाबत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. उष्णेतेच्या लाटेच्या अनुषंगानी सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याचे सूचना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिल्या आहेत.

सतत चौथ्या दिवशी अकोला टॉपवर

उन्हाच्या बाबतीत अकोला विदर्भात टॉपवर राहिला. शनिवारी 43.5 अंश सेल्सिअस, रविवारी 44.0 तर सोमवारी 44.01आणि मंगळवारी 44.02 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चारही दिवस अकोल्याच्या तापमानाने उच्चांक गाठला. मंगळवारी अकोला विदर्भात पहिल्या क्रमांकावर तर दुस-या क्रमांकावर वर्धा राहिले.

आजचे अकोल्याचे तापमान विदर्भातच नव्हेतर जगात पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. सलग चार दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ होत आहे.
-कालुराम मिना,वैज्ञानिक सहाय्यक, हवामान विभाग अकोला

 

Back to top button