

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई मेट्रोच्या उद्घाटनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. तसाच कलगीतुरा आता समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावरून रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबई मेट्रोच्या उद्घाटन पत्रिकेत फडणवीसांचे नाव नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही देण्यात आले नव्हते. येत्या १ मे या महाराष्ट्रदिनी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. त्याबद्दल येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गामधून माझे नाव मिटवू शकणार नाही, असे ठणकावून सांगितले. गेली वीस वर्ष ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. राज्याच्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून संधी दिली तेव्हा हा महामार्ग बांधला, असे फडणवीस यांनी सांगितले.
तेव्हा समृद्धी महामार्गाला विरोध करणारेच आज श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाची तयारी करीत आहे, याचा मला आनंद आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाते तर आनंदच आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन केले तर जास्त चांगले होईल. कारण काम पूर्ण न करता उद्घाटन केल्यास समृद्धी महामार्गाचे महत्त्व कमी होईल, असे फडणवीस म्हणाले.
समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. १ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग सुरु होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ डिसेंबर २०२० रोजी अमरावती भेटीत केली होती. खरे म्हणजे १ मे २०२१ पर्यंत नागपूर ते शिर्डी तर १ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र, कोरोनामुळे मधली दोन वर्षे कामे लांबल्याने येत्या १ मे रोजी नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा सुरू होणार आहे.
उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्ग साकारला आहे. प्रकल्पासाठी फडणवीस यांनी खूप परिश्रम घेतले. कोणी कितीही श्रेय घेतले तरी काम कोणी केले हे जनतेला माहिती आहे. सरकारमध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते केले पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली.