नागपूर: पोलीस निरीक्षकाने केला पिस्तुलाच्या धाकावर तरुणीचा विनयभंग

File photo
File photo

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: अकोल्याच्या एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने आपल्याच सहकाऱ्याच्या उच्चशिक्षित मुलीला स्पर्धा परीक्षेत मदतीच्या निमित्ताने आर्थिक प्रलोभन दाखविले. व तिच्याच घरात घुसून पिस्तुलाच्या धाकावर अश्लील चाळे केले. आपले विवस्त्र फोटो पाठवून तिला न्यूड फोटो व्हॉट्सअॅपवर पाठविण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी पोलिस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. धनंजय सायरे (वय ५६, रा. धामणगाव, जि. अमरावती) असे पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.

नेमकं प्रकार काय ?

  • वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने उच्चशिक्षित मुलीला आर्थिक प्रलोभन दाखविले
  • विवस्त्र फोटो पाठवून तिला न्यूड फोटो व्हॉट्सअॅपवर पाठविण्याची धमकी
  • रात घुसून पिस्तुलाच्या धाकावर अश्लील चाळे
  • नंदनवन पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित २२ वर्षीय तरुणी मूळची अमरावती जिल्ह्यातील असून तिचे वडीलसुद्धा पोलिस खात्यात असल्याने दोघांची जुनी ओळख व धनंजयचे नेहमी घरी येणे-जाणे होते. धनंजय हा पोलिस खात्यांतर्गत परीक्षा देऊन शिपायाचा पोलिस अधिकारी झाला. सध्या तो अकोल्यातील खदान पोलिस ठाण्यात ठाणेदार आहे. पीडितेने एम. टेकपर्यंत शिक्षण घेतले असून तिला पोलिस अधिकारी व्हायचे असल्याने ती सध्या नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. ठाणेदार धनंजय सायरे याने ही संधी साधत तिच्याशी मैत्री केली.

गेल्या पाच वर्षांपासून दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एकतर्फी प्रेमात त्याने तिला आयफोन भेट दिला. सायरे हा पीडितेला व्हॉट्सअॅपवर अश्लील मॅसेज पाठवायला लागला. 'तू मला न्यूड फोटो पाठव…' असा मॅसेज करून स्वतःचा नग्न फोटो त्याने तिला पाठवला. तिने फोटो पाठविण्यास नकार दिला.

दरम्यान, संतप्त सायरेने तिला हॉटेलमध्ये बोलावले. मात्र, तिने नकार देताच सायरे थेट तिच्या घरी गेला. शारीरिक संबंधाची मागणी करीत तिच्यावर बळजबरी करायला लागला. तिने नकार देताच तिच्यावर पिस्तूल रोखली आणि अश्लील चाळे करून भेट दिलेला आयफोन हिसकावत तिला मारहाण केली.

या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यावरही या गंभीर प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमास देण्यास नकार दिल्याने या संदर्भात तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news